बागणीचा भुईकोट किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 07:12 PM2022-05-28T19:12:01+5:302022-05-28T19:32:27+5:30

साधारण चौकोनी आकाराचा हा किल्ला दहा एकरवर पसरलेला आहे. किल्ल्याच्या काही भागामध्ये सध्या काही ठिकाणी जुन्या घरांचे अवशेष, पेशवेकालीन विटांचे काही पडिक स्थितीतील बांधकाम दिसून येते.

Bhuikot fort of Bagani is on the verge of extinction | बागणीचा भुईकोट किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर

बागणीचा भुईकोट किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर

googlenewsNext

सलीम वठारे

बागणी : बागणी (ता. वाळवा) येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. नुकतीच किल्ल्याच्या आग्नेय बाजूची भिंत कोसळली आहे. त्यामुळे अनेकांची मने हेलावली आहेत. या किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

बागणीतील भुईकोट किल्ल्याविषयी ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये विशेष माहिती उपलब्ध नाही. आजच्या स्थितीला या किल्ल्यामध्ये भग्न बुरुज व तटबंदीशिवाय काहीही अवशेष दिसून येत नाहीत. ही तटबंदी व बुरुज पांढऱ्या मातीमध्ये बांधलेले आहेत. किल्ल्याच्या भोवती खंदक होते. परंतु, त्यापैकी काहीच भाग आता शिल्लक आहे. तसेच किल्ल्याच्या काही भागामध्ये सध्या काही ठिकाणी जुन्या घरांचे अवशेष, पेशवेकालीन विटांचे काही पडिक स्थितीतील बांधकाम दिसून येते. या किल्ल्यात महादेव मंदिराजवळ गजलक्ष्मीचे एक शिल्प आहे, परंतु त्याची स्थिती सध्या फार दयनीय झाली आहे.

साधारण चौकोनी आकाराचा हा किल्ला दहा एकरवर पसरलेला आहे. कोटाच्या तीन बाजूला असलेली तटबंदी शिल्लक आहे. किल्ल्यात वाढत्या लोकवस्तीमुळे कोटाच्या चौथ्या बाजूला म्हणजेच पूर्वेला असलेली तटबंदी व खंदक पूर्णपणे नष्ट झाला आहे. कोटाचा मुख्य दरवाजादेखील बहुदा याच भागात असावा. पण तो नष्ट झाल्याने या दिशेला प्रवेशद्वाराची नव्याने सिमेंटमधील कमान उभारली आहे. या कमानीच्या बाजूला हनुमानाचे मंदिर असून, या मंदिरात एक जुने नागशिल्प व विरगळ पाहायला मिळते. कोटाच्या आतच गाव वसल्याने आतील अवशेष पूर्णपणे नष्ट झाले असून, महादेव मंदिर व एक कमान विहीर अशा दोनच जुन्या वास्तू पाहायला मिळतात.

महादेव मंदिराच्या आतील सभागृहाचे बांधकाम कोरीव दगडी खांब व घडीव दगडात केलेले आहे. या बांधकामात दगडात कोरलेले एक सप्तमातृका शिल्प आहे. मंदिराची आतील मूळ वास्तू कायम ठेवून बाहेरील बाजूने मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.

प्रशासनाने लक्ष द्यावे

ग्रामस्थांनी स्वतःची घरे बांधण्याकरिता आतील बाजूने बुरुज-तटबंदीची माती व दगडविटा काढून संपूर्ण किल्ला पोखरून काढला आहे. या किल्ल्यामुळे सांगली जिल्ह्यात बागणी गावाची ओळख आहे. ती ओळख नष्ट होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Web Title: Bhuikot fort of Bagani is on the verge of extinction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.