नव्या ओपीडीचे जानेवारीत भूमिपूजन
By Admin | Published: December 27, 2015 11:50 PM2015-12-27T23:50:19+5:302015-12-28T00:34:32+5:30
सांगली शासकीय रुग्णालय : बांधकामाच्या निविदेला मिळाली मंजुरी, आरोग्यमंत्र्यांना निमंत्रण
सांगली : गेल्या चार-पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील नव्या ओपीडीच्या बांधकामाची निविदा मंजूर झाल्याने पुण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ओपीडीच्या बांधकामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. इमारत उभारणी, दुरुस्ती अशा कामांसाठी केंद्र शासनाने चार वर्षापूर्वी १८ कोटी रुपये सांगलीच्या शासकीय रुग्णालयास मंजूर केले आहेत. यापैकी साडेसहा कोटी रुपये नव्या ओपीडी इमारतीसाठी प्राप्तही झाले आहेत. सध्या हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावीत यांच्याहस्ते दोन वर्षापूर्वी ओपीडी इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतींच्या कामाचा प्रस्ताव तयार करुन तो वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे पाठविला होता. प्रशासकीय मंजुरीअभावी तेव्हापासून फाईल पडून होती. मंजुरी नसल्याने रितसर निविदा प्रक्रियाही करता येत नसल्याने हा निधी पडून होता. दोन महिन्यापूर्वी सांगलीचे आ. सुधीर गाडगीळ यांनी रुग्णालयास भेट देऊन, ओपीडीचा विषय काढला होता. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरच काम सुरु केले जाईल, असे सांगितले होते. पण तत्कालीन अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर यांनी त्यास विरोध केला. मंजूर झालेला निधी मिरजेसाठी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर खा. संजयकाका पाटील, आ. गाडगीळ व आ. शिवाजीराव नाईक यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तक्रार केली. तावडे यांनी याप्रश्नी बैठक घेतली. बैठकीस त्यांनी खा. पाटील, आ. गाडगीळ, आ. नाईक व डॉ. डोणगावकर यांनाही आमंत्रित केले होते. त्यावेळी डोणगावकर यांना चांगलेच फैलावर घेऊन, ओपीडी कामात हस्तक्षेप न करण्याची सूचना करून, तातडीने काम सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या कामास गती आली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने आॅक्टोबर महिन्यात या कामाची निविदा प्रसिद्ध केली होती. प्रारूप निविदा मंजुरीसाठी पुणे येथील सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांना सादर केली. त्यास मंजुरी मिळाली आहे. महिन्याभरात बांधकाम सुरु होईल, असे सांगण्यात आले होते. पुन्हा भूमिपूजन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. यासाठी तावडे यांना आमंत्रित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
दोन इमारती : अशा असतील सुविधा
नव्या ओपीडीच्या दोन इमारती असणार आहेत. यामध्ये दोन मजली रक्तपेढी, लिफ्ट सातत्याने बंद राहत असल्याने स्ट्रेचर रॅम्प तयार केला जाणार आहे. एमआरआय, सिटीस्कॅन व कलर एक्सरे, डॉक्टरांना मार्गदर्शन केंद्र, डोळे तपासणी, क्षयरोग कक्ष, त्वचारोग, लहान मुलांचा कक्ष, डोळे तपासणी, भूल कक्ष, दंत तपासणी, एआरटी सेंटर, प्रशासकीय कार्यालय, वैद्यकीय रेकॉर्ड कक्ष, लहान मुलांवर शस्त्रक्रिया, नाक-कान-घसा तपासणी, परिचारिका कक्ष आदी विभाग असणार आहेत. यामध्ये अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
ुुदुसऱ्यांचा मुहूर्त काढला
आघाडी शासनाच्या काळात तत्कालीन आरोग्यमंत्री विजयकुमार गावीत यांच्याहस्ते नव्या ओपीडीचे भूमिपूजन झाले होते. पण पुढे कोणतेच काम सुरु झाले नाही. आ. सुधीर गाडगीळ, आ. शिवाजीराव नाईक यांनी पाठपुरावा केल्याने अखेर पुन्हा दुसऱ्यांदा भूमिपूजन करण्याचा मूहूर्त लागला आहे.