सांगली-पेठ चौपदरीकरण येत्या शुक्रवारी भूमिपूजन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 05:59 PM2023-01-21T17:59:41+5:302023-01-21T18:00:10+5:30
सांगली-पेठ रस्त्यासाठी ८८१ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीसह मान्यता
सांगली : सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ८८१ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या रस्त्याचे भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २७ जानेवारी रोजी होणार आहे. आष्टा येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल.
वाहनांची वाढती गर्दी, अपघातांचे वाढलेले प्रमाण, खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे ४१ किलोमीटरचा सांगली-पेठ रस्ता नेहमीच चर्चेत राहिला आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला. महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या चौपदरीकरणाचा आराखडा तयार करून केंद्र शासनाला सादर केला होता. शासनाने या कामाला तत्त्वतः मंजुरीही दिली.
त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी रस्त्यासाठी निविदाही प्रसिद्ध करण्यात आली; पण अर्थ समितीची मान्यता नसल्याने ठेकेदारांनी निविदा भरण्याबाबत सावध भूमिका घेतली. अखेर ३ जानेवारी रोजी दिल्लीत अर्थ समितीच्या बैठकीत सांगली-पेठ रस्त्यासाठी ८८१ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीसह मान्यता देण्यात आली. ४१.२५ किलोमीटरचा संपूर्ण रस्ता काँक्रिटचा असेल.