महिला व नवजात शिशु रुग्णालयामुळे मिरजच्या वैभवात भर - पालकमंत्री खाडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 04:21 PM2024-01-31T16:21:38+5:302024-01-31T16:22:50+5:30
मिरज : महिला व नवजात शिशु रुग्णालयामुळे मिरजच्या वैभवात भर पडेल. नागरिकांना आरोग्यासह इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीची ...
मिरज : महिला व नवजात शिशु रुग्णालयामुळे मिरजच्या वैभवात भर पडेल. नागरिकांना आरोग्यासह इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले.
मिरजेत आरोग्य विभागाच्या शंभर खाटांच्या महिला व नवजात शिशु रुग्णालयाचे भूमिपूजन मंगळवारी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, आयुक्त सुनील पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्यचिकित्सक विक्रमसिंह कदम यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत मिरजेत शंभर खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालय उभारण्यासाठी सुमारे ४७ कोटी खर्च करण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिला व नवजात शिशुंना याचा लाभ होणार आहे. मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास २५ कोटी रुपयांची एमआरआय मशीन व सांगली सिव्हिलमध्ये दहा कोटी रुपयांचे सीटीस्कॅन मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सिव्हिल हॉस्पिटलला मल्टीपर्पज हॉस्पिटल जोडण्याचा प्रस्तावही केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हे रुग्णालय बांधकामासाठी मिरजेत किसान चौकातील ५,२०९ चौरस मीटर जागा महसूल विभागाने आरोग्य विभागास दिली आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी महसूल विभागाकडून आरोग्य विभागास जागा हस्तांतरित केल्याची कागदपत्रे यावेळी दिली.
यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, माजी नगरसेविका डॉ. नर्गिस सय्यद यांच्यासह रुग्णालयातील, अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.
शासनाच्या योजनांचा लाभ
१०० खाटांच्या महिला व नवजात शिशु रुग्णालयामुळे स्त्रियांसाठी स्वतंत्र आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभाग, प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात तपासणी, उपचार, जोखमीच्या गरोदर मातांची तपासणी व उपचार, गरोदर माता व स्तनदा माता यांना केंद्र शासन व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे. नवजात व शिशु बालकांना अति दक्षता विभाग, एनबीएसयू, एनआयसीयू व एसएनसीयू अंतर्गत बालरोगतज्ज्ञांमार्फत तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया होणार आहेत. येथे अत्याधुनिक उपकरणे साहित्य उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालयातील गंभीर महिला व नवजात बालकांवर येथे उपचार करता येणार आहेत.