भूमिपुत्र सीताराम कुंटे यांनी जिल्ह्यासाठी दिले ११३ कोटी रूपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:26 AM2021-03-05T04:26:29+5:302021-03-05T04:26:29+5:30
सांगली : राज्याच्या मुख्य सचिवपदाची सुत्रे स्वीकारताच सीताराम कुंटे यांनी जिल्ह्यातील वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधीची तरतूद केली ...
सांगली : राज्याच्या मुख्य सचिवपदाची सुत्रे स्वीकारताच सीताराम कुंटे यांनी जिल्ह्यातील वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. गुरूवारी कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत निधी मंजूर झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ११३ कोटी रूपयांचे विविध प्रकल्प मार्गी लागणार आहेत. सांगलीकर असलेल्या कुंटे यांनी दिलेल्या या निधीमुळे जिल्ह्याला फायदा होणार आहे.
सांगलीच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात १०० खाटांचे महिला व नवजात शिशू रूग्णालयाला मंजुरी मिळाली होती. मात्र, हा प्रकल्प रखडला होता. कुंटे यांनी पहिल्याच बैठकीत यासाठी ४५ कोटी ९३ लाख रूपये मंजूर केल्याने या रूग्णालयाच्या कामाला गती मिळणार आहे.
आटपाडी येथील ३० खाटांचे रूग्णालय अपुरे पडत असल्याने रूग्णांचे होणारे हाल लक्षात घेऊन याठिकाणी अजूनही सुविधांची मागणी होत होती. त्यानुसार आता वाढीव २० खाटांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता हे रूग्णालय ५० खाटांचे होणार आहे. दोन्ही कामांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. मात्र, मंजुरी मिळण्यासह निधी तरतुदीतही अडचणी होत्या. आता लवकरच हे दोन्ही कामे सुरू होणार आहेत.
चौकट
आरोग्य यंत्रणा सक्षम होणार
मूळचे सांगलीकर असलेल्या कुंटे यांनी मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर लगेचच रखडलेल्या कामांना मंजुरी देत दिलासा दिला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर त्यांचा भर असल्याने सर्वसामान्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.