सांगलीचे भूषण गणेशदुर्ग..; चारही बाजूंनी खंदक असलेला अष्टकोनी भुईकोट किल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 04:16 PM2024-01-08T16:16:50+5:302024-01-08T16:17:42+5:30
देशाचा पहिला स्वातंत्र्य दिन अनुभवण्याचे भाग्यही या किल्ल्यास लाभले
दत्तात्रय शिंदे
थोरले चिंतामणराव पटवर्धन यांनी मिरज संस्थानमधून बाहेर पडून इ.स. १८०१ साली सांगली स्वतंत्र संस्थान स्थापन केले. ‘दुर्ग हे राज्याचे सार’ याची पुरेपूर जाण असलेल्या चिंतामणरावांनी नंतरच्या काही वर्षांत सांगलीत भुईकाेटाचे काम हाती घेतले. चारही बाजूंनी खंदक असलेला हा अष्टकाेनी भुईकोट किल्ला म्हणजे सांगलीचे एक भूषणच.. देशाचा पहिला स्वातंत्र्य दिन अनुभवण्याचे भाग्यही या किल्ल्यास लाभले.
स्वतंत्र संस्थानच्या स्थापनेनंतर चिंतामणरावांनी सांगलीच्या सुरक्षेसाठी भुईकाेट उभारला. पटवर्धन घराणे परम गणेशभक्त. गणेशावरील श्रद्धेमुळे या किल्ल्याचे नावही ‘गणेशदुर्ग’ ठेवले. ‘हे राज्य गणेशाचे, आपण केवळ मुखत्यार आहाेत’, ही राजांची भावना हाेती. याच भावनेतून किल्ल्यातील दरबारात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली.
सुरुवातीच्या काळात किल्ल्याच्या उत्तर बाजूस दाेन बुरुजांमध्ये एकच दरवाजा होता. दरवाजावर अणकुचीदार खिळे ठाेकलेले असल्याने हा काटेदरवाजा म्हणून ओळखला जात असे. काटेदरवाजाच्या आतमध्ये मधाेमध एक भव्य बुरूज आहे. या बुरुजास गणेश बुरूज म्हटले जाते. आता दक्षिण आणि पूर्व बाजूस आणखी दोन प्रवेशद्वारे आहेत. चारही बाजूंनी खंदक व अष्टकाेनी आकारातील हा भुईकाेट मिरज किल्ल्याची रचना समाेर ठेवून उभारला गेला असावा, असे सांगितले जाते.
सांगली संस्थानचा कारभार याच इमारतीतून चालत असे. पुढील काळात रेव्हॅन्यू ऑफिस म्हणून ओखळल्या जाणाऱ्या मुख्य इमारतीसह अनेक बांधकामे येथे झाली. राजांचे हुजूर कार्यालय, शस्त्रागार, घाेड्यांसाठी पागा उभारून किल्ल्यात एक भक्कम लष्करी ठाणे बनविण्यात आले. मुख्य प्रवेशद्वारासमाेर न्यायालयासाठी दाेन इमारती उभारण्यात आल्या. कैद्यांसाठी कारागृह तयार करण्यात आले. स्वातंत्र्यलढ्यामध्ये याच कारागृहाच्या भिंतीवरून बाजूच्या खंदकात उडी घेत वसंतदादा पाटील यांच्यासह स्वातंत्र्यसेनानींनी ऐतिहासिक पलायन केले हाेते.
आता किल्ला व त्याच्या परिसरात जिल्हाधिकारी यांचे भांडार, भूमिअभिलेख, केंद्रीय जेल, स्वच्छताविषयक उपविभाग, सार्वजनिक आरोग्य, होमगार्ड अशी विविध सरकारी कार्यालये आहेत. याशिवाय खासगी मालमत्ता, शाळा, महाविद्यालय, तसेच एक छोटेखानी प्रेक्षणीय संग्रहालयही आहे.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर सांगली संस्थान भारतात विलीन झाले. देशाचा पहिला स्वातंत्रसाेहळा येथेच साजरा झाला. दरबार हॉलसमाेरील चाैकात श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन (दुसरे) यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले हाेते. आज किल्ल्याचा बराचसा भाग काळाच्या ओघात नष्ट झाला असला तरीही तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार मात्र सुस्थितीत आहे. हा ऐतिहासिक ठेवा सांगलीचे भूषण ठरणारा आहे.