Sangli News: डाळिंबावर बिब्या रोगाचा प्रादुर्भाव; ढगाळ वातावरण, रिमझिम पावसाचा परिणाम
By श्रीनिवास नागे | Published: July 25, 2023 04:04 PM2023-07-25T16:04:36+5:302023-07-25T16:06:03+5:30
दरीबडची (जि. सांगली ) : ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस, प्रतिकूल हवामान यामुळे जत तालुक्यातील डाळिंबांवर बिब्या, फळकुज रोगांचा प्रादुर्भाव ...
दरीबडची (जि. सांगली) : ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस, प्रतिकूल हवामान यामुळे जत तालुक्यातील डाळिंबांवर बिब्या, फळकुज रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करीत शेततलाव व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन डाळिंबाच्या बागा उभ्या केल्या आहेत. डाळिंबाचे क्षेत्र १५ हजार ३४४.५९ एकर आहे. केशर वाणाच्या बागा अधिक आहेत. संख, दरीबडची, उमदी, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी, सिध्दनाथ, आसंगी (जत) दरीकोणूर, वाळेखिंडी, काशीलिंगवाडी या परिसरात डाळिंब क्षेत्र अधिक आहे. शेतकऱ्यांनी टँकरने पाणी देऊन बागा वाचविल्या आहेत.
आता मान्सून पाऊस, ढगाळ व प्रतिकूल वातावरणाचा फटका बसला आहे. फळावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. रोगाने फळे फुटली आहेत. तेल्या रोगग्रस्त फळे तोडून टाकली आहेत. बागेजवळ फळाचे ढीग लागले आहेत. उत्पादनात घट होणार आहे.
बागा वाचवण्याची धडपड सुरु आहे. प्रादुर्भाव टाळण्यासाठी महागड्या औषधांचा मारा करत आहेत. मात्र कशाचाही उपयोग होत नाही हे लक्षात आल्याने अनेक शेतकऱ्यांनी बागा सोडून दिल्या जात आहेत. लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
विकास सोसायट्या संकटात
तालुक्यातील विकास सोसायट्यांनी बागांवर कोट्यवधीच्या कर्जाचे वाटप केले आहे. बागा अडचणीत आल्याने लाखो रुपयांची येणेबाकी असल्याने विकास सोसयट्या अडचणीत येणार आहेत.