सायकल सुसाट; चुलीला अच्छे दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:38 AM2021-02-26T04:38:30+5:302021-02-26T04:38:30+5:30
घाटनांद्रे : दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती गगनाला भिडल्याने ग्रामीण भागातील जनतेला प्रवासासाठी वाहने व घरी गॅस वापरणे ...
घाटनांद्रे : दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती गगनाला भिडल्याने ग्रामीण भागातील जनतेला प्रवासासाठी वाहने व घरी गॅस वापरणे आवाक्याबाहेर गेले आहे. यामुळे अनेकांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. इंधनाला पर्याय म्हणून सायकल सुसाट झाली असून, गॅसऐवजी आता चुलीला अच्छे दिन आल्याचे चित्र कवठेमहांकाळ तालुक्यात पहायला मिळत आहे.
गेल्या महिनाभरापासून पेट्रोलच्या किमतीचा आलेख वाढत आहे. तसेच घरगुती गॅस सिलिंडरचे दरही इंधनाशी स्पर्धा करत आहेत. इंधनाचे दर शंभरी गाठत आले आहेत, तर गॅस आठशे रुपयांपर्यंतच्या घरात पोहोचला आहे. अर्थातच या दरवाढीचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसतो आहे. हे दर त्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहेत.
यावर पर्याय म्हणून ग्रामीण भागातील जनतेने दुचाकी सरळ घरात लावली असून, त्याऐवजी सायकल चालविण्यास प्राधान्य दिले आहे. अलीकडे सायकलींचे दर त्या त्या कंपनी व प्रकारानुसार कमीत कमी अडीच हजार ते आठ हजारापर्यंत आहेत. त्याची मागणीही सध्या वाढत आहे तर दुसरीकडे ग्रामीण महिलांनीही गॅसच्या वाढत्या किमतीमुळे गॅस वापराऐवजी चुलीच्या वापरास प्राधान्य दिले आहे.
चाैकट
चुलीचा पर्याय स्वीकारला
गॅसचे दर आठशे रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. सध्या घरगुती गॅस ७९७ रुपयांना मिळत आहेत. ग्रामीण भागात एक कुटुंबाला साधारण एक ते दोन मण जळण महिन्यासाठी लागते. एक मणाचा (४० किलो) दर सध्या २५० रुपये आहे. यामुळे अनेक महिलांनी घरचे आर्थिक बजेट सावरण्यासाठी चुलीचा पर्याय स्वीकारला आहे.
चाैकट
सायकलचे दर वाढले
पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने अनेक नागरिक सायकलीकडे वळू लागल्याने सायकलीचे दरही वाढू लागले आहेत. मोठ्या सायकलीचे दर ३५०० ते ४५०० वरून ४५०० ते ५५००वर तर लहान मुलांच्या सायकली १५०० ते २५०० वरून २५०० ते ३५०० झाले आहेत, अशी माहिती कवठेमहंकाळ येथील सायकल विक्रेते माणिक जगताप यांनी दिली.