पुणेकरांनी दिलेल्या सायकलींनी दिली विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:32 AM2021-09-08T04:32:39+5:302021-09-08T04:32:39+5:30
आरगमध्ये प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना सायकली भेट देण्यात आल्या. यावेळी डॉ. आशिष देशपांडे, हरिभाऊ गावडे आदी उपस्थित होते. लोकमत ...
आरगमध्ये प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना सायकली भेट देण्यात आल्या. यावेळी डॉ. आशिष देशपांडे, हरिभाऊ गावडे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
लिंगनूर : येथील मुलांच्या प्राथमिक शाळेत सायकल बँक उपक्रमाअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप झाले. वाडी-वस्तीवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ आशिष देशपांडे यांच्याहस्ते वाटप झाले.
पुणेस्थित गीता व मैत्र एज्युकेशन ॲण्ड सोशल फाऊंडेशनतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. वाडीवस्तीवरुन चालत शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची पायपीट सायकल मिळाल्याने थांबली आहे. पुण्यातील सिम्बॉयसिस कायदा महाविद्यालयातील व्याख्याते व फाऊंडेशनचे प्रवर्तक डॉ. आशिष देशपांडे यांनी सायकली संकलित केल्या होत्या. सजग पुणेकरांनी घरात पडून असलेल्या सायकलींचे दान देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद मिळून डझनभराहून अधिक सायकली मिळाल्या. त्यांची गरजेनुसार दुरुस्ती करून विद्यार्थ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या.
वरिष्ठ मुख्याध्यापक हरिभाऊ गावडे म्हणाले, वाडी-वस्तीवरून शाळेत चालत यावे लागत असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असे. अनेकजण शाळेत येणे टाळून शेतातच काम करत थांबायचे. सायकली मिळाल्याने विद्यार्थ्यांची अडचण दूर झाली आहे. संयोजन गणेश गुरव, परशराम जाधव आदींनी केले.