तासगावात बोगस बिले जोडून काढले सायकलींचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 11:47 PM2017-08-04T23:47:34+5:302017-08-04T23:47:34+5:30
दत्ता पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : महिला व बालकल्याण विभागामार्फत सायकल अनुदानातील मोठे गौडबंगाल तासगाव पंचायत समितीच्या कारभारात चव्हाट्यावर आले आहे. प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या सायकल दुकानाच्या नावे, सायकल खरेदीची बोगस बिले प्रस्तावात जोडली आहेत. एकूण ७६ पैकी ७४ प्रस्तावांना ही बोगस बिले जोडण्याचा कारनामा बालविकास प्रकल्पातील कर्मचाºयांनी केला आहे. पुरवठा केलेल्या सायकलीही हलक्या दर्जाच्या आहेत.
जिल्हा परिषद स्तरावर होणारी वस्तूंची खरेदी निकृष्ट दर्जाची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वस्तू खरेदीचे स्वातंंत्र्य लाभार्थ्याला देत, अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र तासगावात टक्केवारीच्या हव्यासापोटी लाभार्थ्यांच्या माथी निकृष्ट दर्जाच्या सायकली मारण्यात आल्या आहेत. मागील आर्थिक वर्षात तालुक्यातील ७६ लाभार्थ्यांना सायकलचे अनुदान मिळाले. त्यापैकी दोन लाभार्थ्यांनी सांगलीतील दुकानदाराकडून नामांकित कंपनीची सायकल खरेदी केली आहे. उर्वरित ७४ लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला बाल विकास प्रकल्पातील एका कर्मचाºयाकडून बोगस पावत्या जोडण्यात आल्या आहेत. नवेखेड (ता. वाळवा) येथे अस्तित्वात नसलेल्या अभिमन्यू सायकल मार्ट या दुकानाच्या नावाच्या सर्व पावत्या आहेत. ही पावती जोडण्यात आलेल्या लाभार्थ्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून सायकलींचा पुरवठा करण्यात आला. या सायकलीही हलक्या दर्जाच्या आहेत. वास्तविक बाजारात नामांकित ब्रॅन्डच्या सायकली उपलब्ध आहेत. मात्र पंचायत समितीतील कर्मचाºयांकडून लाभार्थ्यांना हलक्या दर्जाची आणि बाजारात ३२०० ते ३४०० रुपयांपर्यंत किमतीत उपलब्ध असणारी सायकल माथी मारण्याचा उद्योग झाला आहे.
सायकल पुरवठ्यात पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाºयांच्या टक्केवारीचीच सायकल असल्याचा संशय व्यक्त होत आहे. कारण एका कर्मचाºयाकडून बोगस पावत्या जोडून, अधिकारी आणि पदाधिकाºयांच्या डोळ्यात धूळफेक करुन होणारे सायकलींचे वाटप हे कोणाच्या तरी पाठबळाशिवाय शक्य नाही. या प्रकरणाचा सखोल तपास करुन दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.
७४ सायकली एकाच विक्रेत्याकडून
सायकल वाटप अनुदानांतर्गत तालुक्यात ७६ लाभार्थींना सायकली मिळालेल्या आहेत. यापैकी केवळ दोनच लाभार्थ्यांनी सांगलीतील सायकल दुकानाचे बिल जोडले आहे. उर्वरित ७४ लाभार्थ्यांच्या बिलासोबत नवेखेड येथील अभिमन्यू सायकल मार्ट हे नाव असलेल्या सायकल विक्रेत्याची बिले जोडलेली आहेत. मात्र बिल जोडण्यात आलेले दुकान तेथे अस्तित्वातच नाही. त्यामुळे एकूणच, सायकल वाटप प्रकरण संशयाच्या भोवºयात सापडले आहे.