तासगावात सायकल वाटपात गोलमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 11:44 PM2017-08-03T23:44:35+5:302017-08-03T23:44:40+5:30
दत्ता पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून, महिला व बालकल्याण विभागामार्फत शालेय मुलींसाठी सायकलींसाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षात निधीची तरतूद करण्यात आली होती. शासनाच्या नव्या धोरणानुसार लाभार्थ्यांना वस्तूचे वाटप न करता, त्याएवेजी अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय आहे. मात्र हा निर्णय बासनात गुंडाळून तासगाव पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत सायकल वाटप करण्याचा कारनामा चव्हाट्यावर आला आहे. यात टक्केवारीचाही झोल झाला आहे.
या सायकल वाटपासाठी लाभार्थ्यांकडून तीनशे रुपयांप्रमाणे पैसेही गोळा करण्यात आल्याचे चव्हाट्यावर आले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी मावळत्या सभागृहाने महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून शालेय मुलींना सायकल खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मार्चपूर्वी निधी खर्ची टाकण्यासाठी धावपळदेखील झाली होती. मार्चपूर्वीच जिल्हा परिषद सदस्यांच्या शिफारशींनुसार तालुकास्तरावर प्रस्ताव गोळा करुन जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते.
राज्य शासनाने लाभार्थ्यांना वस्तूंचे वाटप करण्याच्या निर्णयात बदल केला आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना जिल्हा परिषद स्तरावरुन वस्तू खरेदी करुन थेट दिली जात होती. मात्र अशा प्रकारामुळे लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाची वस्तू मिळत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे शासनाने वस्तूऐवजी थेट अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावेळी झालेल्या सायकल वाटपाऐवजी सायकलचे ३ हजार ९०० रुपयांप्रमाणे अनुदान लाभार्थ्याच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे पंचायत समिती स्तरावरुन प्रस्तावासोबत लाभार्थ्याने सायकल खरेदी केलेली पावती आणि बँक खाते नंबर घेण्यात आला होता. जिल्हा परिषदेकडून प्रस्तावाची तपासणी करुन संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात आले होते.
बहुतांश तालुक्यात याच पध्दतीने अंमलबजावणी झाली आहे. मात्र तासगाव तालुक्यात सायकल वाटपात गोलमाल झाल्याचे दिसून येत आहे. मार्चमध्ये लाभार्थ्यांची यादी निश्चित झाल्यानंतर बहुतांश तालुक्यात एप्रिल, मे महिन्यात संबंधित लाभार्थ्यांनी सायकल खरेदी केली होती. मात्र तासगाव तालुक्यात तब्बल तीन महिन्यानंतर, चार दिवसांपूर्वी अनुदानाऐवजी थेट सायकलींचेच वाटप करण्यात आले आहे. शासनआदेशाला हरताळ फासून पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागाकडून थेट पंचायत समितीच्या आवारात खुलेआमपणे सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर या सायकल वाटपासाठी प्रस्तावासोबतच एका कर्मचाºयाने तीनशे रुपये घेतल्याचेही चव्हाट्यावर आले आहे.
एकीकडे लाभार्थ्याकडून तीनशे रुपये, आणि दुसरीकडे लाभार्थ्याने स्वत: सायकल खरेदी करावयाची असतानादेखील, एका एजन्सीच्या माध्यमातून सायकल खरेदी करुन टक्केवारी, असा दुहेरी मलिदा मिळविण्यासाठी खटाटोप करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. तसेच पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून, शासनाचा आदेश गुंडाळून ठेवत, कागदोपत्री मेळ घालून खरेदीचे उद्योग अद्यापही सुरु असल्याचे उजेडात आले आहे. याची चौकशी होऊन दोषी अधिकारी आणि कर्मचाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
वाटपात ‘इंटरेस्ट’ : बदलीनंतरही...
तासगाव पंचायत समितीत महिला व बालकल्याण विभागात कार्यरत असणाºया एका कनिष्ठ सहाय्यक कर्मचाºयाची ३१ मेरोजी दुसºया तालुक्यात बदली झाली. याच कर्मचाºयाकडे सायकल अनुदानाचा विषय होता. बदली झालेल्या कर्मचाºयाचा पदभार दुसºया कर्मचाºयाने घेतला होता. मात्र अद्याप बदली झालेल्या संबंधित कर्मचाºयाचा सायकल वाटपात इंटरेस्ट कायम होता. अगदी गुरुवारी पंचायत समितीत सायकल वाटपावेळी संबंधित कर्मचारी तासगाव पंचायत समितीत आल्याचे दिसून आले. त्यामुळे या कर्मचाºयाचा बदलीनंतरही सायकल वाटपात असलेला ‘इंटरेस्ट’ चर्चेचा विषय ठरला आहे.
वाळवा तालुक्यातून सायकलींची खरेदी
वाटप केलेल्या सायकलींचा पुरवठा वाळवा तालुक्यातील नवेखेड येथील एका पुरवठादाराने केला आहे. संबंधित पुरवठादाराचा कोणताही सायकल विक्रीचा व्यवसाय नाही. मात्र तरीदेखील त्याने ४० सायकलींचा पुरवठा केला आहे. तासगाव व सांगलीसारखे ठिकाण खरेदीसाठी सोयीचे असतानादेखील, वाळवा तालुक्यातून सायकली खरेदीमागे टक्केवारीचा संशय व्यक्त होऊ लागला आहे.
अधिकारी, लोकप्रतिनिधी अनभिज्ञ
सायकल वाटप अनुदानासाठी तत्कालिन जिल्हा परिषद सदस्यांनी नावांची शिफारस केली होती. मात्र यापैकी एकाही सदस्यास सायकल वाटपाची माहिती नाही. पंचायत समितीच्या आवारात झालेल्या सायकल वाटपाबाबतही पदाधिकारी आणि अधिकारीही अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. सायकल वाटपाची माहिती घेण्यासाठी काही तत्कालिन जि. प. सदस्यांशी सपर्क केला असता, या सदस्यांनीही लाभार्थ्यांकडून माहिती घेतली. लाभार्थ्यांकडून एका कर्मचाºयाने तीनशे रुपये घेतल्याचे त्यांना समजले. तसेच खरेदीची पावतीही संबंधित कर्मचाºयानेच उपलब्ध करुन दिल्याचेही सांगितले. इतकेच नव्हे, तर लाभार्थ्यांची स्वत:च्या गावात बँक खाती असतानादेखील, तासगावमध्ये नव्याने बँकखाते काढण्यास सांगितल्याची माहितीही निदर्शनास आली.