गणेशोत्सवानंतर फुलांच्या दरात मोठी घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:30 AM2021-09-24T04:30:21+5:302021-09-24T04:30:21+5:30
सांगली : गणेशोत्सव काळात मागणीत वाढ झाल्याने बहरलेली फुले आता उत्सवानंतर दरातील घसरणीमुळे कोमेजली आहेत. नवरात्रोत्सवापर्यंत ही स्थिती कायम ...
सांगली : गणेशोत्सव काळात मागणीत वाढ झाल्याने बहरलेली फुले आता उत्सवानंतर दरातील घसरणीमुळे कोमेजली आहेत. नवरात्रोत्सवापर्यंत ही स्थिती कायम राहील, असा अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला आहे.
उत्सवाच्या काळात फुलांनी दरात मोठी झेप घेतली होती. शंभर ते पाचशे रुपये किलोपर्यंत फुलांचे भाव पोहोचले होते. मागणीच्या तुलनेत पुरवठाही कमी झाला होता. गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत आहे. त्यापूर्वी साडे पाच महिने निर्बंधांमुळे नागरिकांना कोणताही सण, सोहळा करता आला नाही. लगीन सराईसुद्धा निर्बंधांमुळे वाया गेली. त्यामुळे या काळात टप्प्याटप्प्याने वाढणारी फुलांची मागणीही थांबली होती. त्यामुळे फूलउत्पादक व व्यापारी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
निर्बंध उठल्यामुळे आता सण साजरे होत आहेत. गणेशोत्सव काळात त्यामुळे फुलांना मोठी मागणी दिसून आली. या काळात फुलांनी दराच्या माध्यमातून शेतकरी, व्यावसायिकांना दिलासा दिला. अकरा दिवसांचा उत्सव संपल्यानंतर आता फुलांचे दर पुन्हा खाली गेले आहेत. त्यामुळे आता फुलांना भाव मिळण्यासाठी नवरात्रोत्सवाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.
फुलांच्या दरातील फरक (प्रतिकिलो)(प्रतिकिलो)
फुले उत्सवात उत्सवानंतर
निशिगंध ६५० १५०-२००
गलांडा १६० १००
झेंडू ८० ५०
शेवंती २०० १००-११०
पांढरी शेवंती २२० १२५
गुलाब ४०० शेकडा २५०
कोट
सध्या फुलांचे भाव उतरले आहेत. येत्या नवरात्रोत्सवात मागणी वाढली तरच फुलांचे भाव वधारतील. बाजारात गेल्या काही महिन्यांपासून फुलांच्या व्यापारात अडचणी होत्या. आता सणांमुळे थोडा दिलासा मिळाला आहे.
- अमोल आपटे, फूल विक्रेते