मोठ्या नेत्याचा फोन आल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची सभेकडे पाठ, शिवसेनेच्या आनंदराव पवार यांचा गौप्यस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 03:42 PM2021-11-11T15:42:18+5:302021-11-11T15:43:06+5:30
Sangli : गेल्या कित्येक दिवसांपासून पालिकेची सभा तहकूब किंवा पुढे ढकलली जात आहे. आज रस्ते कामासाठी आलेल्या निधीचा वापर तातडीने करण्याच्या कामी विशेष सभा बोलावली होती.
इस्लामपूर : पालिकेच्या आजच्या विशेष सभेला जाऊ नका असा मोठ्या नेत्याचा फोन आल्याचे एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने सांगितले, असा गौप्यस्फोट करत शिवसेनेच्या आनंदराव पवार यांनी राष्ट्रवादीला शहराच्या विकासाचे देणे- घेणे नाही. त्यामुळेच त्यांनी सभेला यायचे टाळले असा आरोप केला. राष्ट्रवादीच्या विकासकामांना विरोध करण्याच्या कृतीचा पवार यांनी थेट सभागृहात निषेध केला.
गेल्या कित्येक दिवसांपासून पालिकेची सभा तहकूब किंवा पुढे ढकलली जात आहे. आज रस्ते कामासाठी आलेल्या निधीचा वापर तातडीने करण्याच्या कामी विशेष सभा बोलावली होती. नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील अध्यक्षस्थानी होते. मुख्याधिकारी वैभव साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेला केवळ ११ सदस्य हजर होते. कायद्यानुसार गणपूर्ती होत नसल्याने पाटील यांनी ही सभा तहकूब करून शनिवारी घेण्याचे जाहीर केले. दरम्यान विक्रम पाटील यांनीही राष्ट्रवादी नगरसेवकांचा निषेध केला.
शकील सय्यद म्हणाले, आनंदराव पवार यांच्या पाठपुराव्यातून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ कोटींचा निधी दिला. या निधीतून शहरात विकासकामे सुरू करण्यासाठी तसेच या निधीचा विनियोग मार्च २२ पूर्वी होणे गरजेचे आहे.मात्र राष्ट्रवादीला पुन्हा विकास कामांना विरोध करावयाचा आहे हे आज स्पष्ट झाले. त्यांच्या या कृतीचा निषेध करतो.