मोठी बातमी: 'मविआ'च्या कुस्तीत 'ठाकरेंचा पैलवान' जिंकला, सांगलीत विशाल पाटलांना धक्का, अपक्ष लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 12:51 PM2024-04-09T12:51:05+5:302024-04-09T12:54:13+5:30
Congress Vishal Patil: जागावाटपात सांगलीची जागा काँग्रेसकडे खेचण्यात अपयश आल्याने मविआत विशाल पाटील हे बंडखोरी करणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे.
Sangali Lok Sabha : राजधानी मुंबईत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीच्या जागावाटपाची घोषणा केली आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी २१ जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, १७ जागांवर काँग्रेस आणि १० जागांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या जागावाटपात पश्चिम महाराष्ट्रातील सांगली लोकसभा मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटणार, याबाबत मोठी उत्सुकता होती. कारण या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये मोठा संघर्ष सुरू होता. मविआकडून आज जाहीर झालेल्या जागावाटपात अखेर या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची शिवसेनाच निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री आणि आमदार विश्वजीत कदम हे प्रयत्नशील होते. मविआच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, यासाठी कदम यांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या अनेकदा भेटीगाठीही घेतल्या. मात्र कदम यांच्या प्रयत्नांना अपयश आल्याचं दिसत आहे. त्यामुळे सांगलीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर केलेले चंद्रहार पाटील हेच मविआचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. अशा स्थितीत काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले विशाल पाटील हे बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
विशाल पाटील बंडाच्या तयारीत?
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील अपक्ष आणि काँग्रेस पक्षाकडून असे दोन अर्ज भरणार असल्याची माहिती. पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक नाही तर बंडखोरी होणार हे निश्चित आहे. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजीमंत्री डॉ. विश्वजित कदम, उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष व जतचे आमदार विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी मुंबई ते दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी घेऊनही ही जागा काँग्रेसकडे खेचण्यात अपयश आल्याने सांगलीत मविआमध्ये बंडखोरी होणार, हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे.
दरम्यान, विशाल पाटील हे खरंच बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार की त्यांची समज घालण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना यश येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.