मुलांच्या अभिव्यक्तीला प्रसारमाध्यमात मोठी संधी
By admin | Published: January 22, 2016 12:57 AM2016-01-22T00:57:44+5:302016-01-22T01:04:22+5:30
गोविंद गोडबोले : धनगावात बालकुमार साहित्य संमेलन उत्साहात; काव्यसंमेलन, एकपात्रीचे आयोजन
भिलवडी : आजचे युग हे प्रसारमाध्यमांचे युग आहे. येत्या काही वर्षांत प्रसारमाध्यमांत मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार असून, मुलांना अभिव्यक्त होता आले पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष व बालसाहित्यिक गोविंद गोडबोले यांनी केले. धनगाव (ता. पलूस) येथे साने गुरूजी संस्कार केंद्र, भिलवडी व जि. प. प्राथमिक शाळा यांच्यावतीने आयोजित पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनामध्ये ते बोलत होते.
गोडबोले म्हणाले, कोणतीही कला वाईट असत नाही. बालवयातूनच मुलांनी एखादी कला किंवा छंद जोपासावा. मुलांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांनीही प्रयत्नशील राहावे.
स्वागताध्यक्ष सुभाष कवडे यांनी, बुध्दी आणि मनाच्या प्रसन्नतेसाठी साहित्याला पर्याय नसून, मातृभाषा हे संस्काराचे माध्यम असल्याचे प्रतिपादन केले. संमेलनाच्या उद्घाटक सुनीता चितळे यांनी, आई-वडिलांना मुलांसाठी वेळ नसल्याने संस्कार केंद्रांची गरच असल्याचे मत व्यक्त केले.
तिसऱ्या सत्रात ‘आनंददायी शिक्षणासाठी साहित्य’ या विषयावर बालसाहित्यिका व कवयित्री सौ. वर्षा चौगुले यांची प्रतीक्षा पवार, आदिती माने, आकांक्षा जाधव, श्रुतिका यादव यांच्यासह उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रकट मुलाखत घेतली. बालसाहित्यिका सौ. मीनाक्षी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व कवी संदीप नाझरे यांच्या उपस्थितीत ‘किलबिल गाणी’ हे काव्यसंमेलन पार पडले. संदीप नाझरे यांनी ‘रुसलेली कळी’ ही कविता सादर केली. सरोज गुरव, उत्कला आढाव या शिक्षकांसह पारस साळुंखे, श्रुती पाटील, सायली अनुगडे, प्रतीक्षा पवार, साक्षी फडतरे, सिध्दी साळुंखे, अंजली माने, विभावरी उतळे, तुषार पाटील यांच्यासह २७ बालकवींनी यात सहभाग घेतला.
‘धमाल गोष्टी’ या सत्रात सौ. भाग्यश्री चौगुले यांनी सादर केलेल्या प्रापंचिक गमती-जमतीवरील एकपात्री प्रयोगाने धमाल उडवून दिली. अध्यक्ष ‘हास्ययात्रा’कार शरद जाधव यांनी हास्याचे उत्तम आरोग्यासाठीचे महत्त्व विषद केले. धनगावच्या सरपंच सौ. सुवर्णा पाटील, उपसरपंच घन:श्याम साळुंखे, दीपक भोसले, दत्ता उतळे, सचिन साळुंखे, संभाजी साळुंखे, संजय रोकडे, बाळासाहेब कांबळे, डॉ. सुमित साळुंखे, अशोक साळुंखे, शरद साळुंखे, संभाजी यादव, सौ. जिजाबाई साळुंखे, अपर्णा हिरूगडे, वंदना जाधव उपस्थित होते.
मुख्याध्यापक कोंडीराम यादव, दिलीप गायकवाड, बाळासाहेब माने, उत्कला आढाव, सरोज गुरव, शशिकांत भागवत, ज्ञानेश्वर रोकडे, अविनाश साळुंखे यांनी संयोजन केले. (वार्ताहर)
लक्षवेधी ग्रंथदिंडी
लेझीम, झांजपथक व भजनी मंडळाच्या सहभागाने गावातून सवाद्य काढण्यात आलेली ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली. पारंपरिक वेशभूषेत व कोल्हापुरी फेटे परिधान केलेले विद्यार्थी सर्वांचे आकर्षण ठरत होते.