सांगलीच्या मातीत क्रांतीची मोठी शक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:11 AM2019-02-25T00:11:20+5:302019-02-25T00:11:26+5:30
वाळवा : सांगली जिल्ह्याच्या मातीत क्रांतीची मोठी शक्ती आहे. या राज्याला ताठ मानेने उभे करणाऱ्या सहकाराची नाळ ही प्रत्यक्ष ...
वाळवा : सांगली जिल्ह्याच्या मातीत क्रांतीची मोठी शक्ती आहे. या राज्याला ताठ मानेने उभे करणाऱ्या सहकाराची नाळ ही प्रत्यक्ष समाजजीवनाशी जोडलेली आहे. ती बिघडली तर समाज बिघडायला व उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी केले.
वाळवा येथे रविवारी पोपटराव पवार यांना यावर्षीचा ‘अरुणभैया नायकवडी राज्यस्तरीय पुरस्कार’ हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि रोख पंचवीस हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच यावर्षीचे ‘अरुणभैया नायकवडी पारितोषिक’ दापोली कृषी विद्यापीठातील एम.एस्सी. अॅग्रीमध्ये पहिली आलेली विद्यार्थिनी अंकिता कोळी (उरण, जि. रायगड) हिला पोपटराव पवार यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल, रोख दहा हजार रुपये असे या पारितोषिकाचे स्वरूप होते. यावेळी पोपटराव पवार म्हणाले, राष्ट्रपुरुषांची ‘ग्रामगीता’ आणि दुष्काळ व दुष्काळग्रस्त यांचे चिंतन करायला लावणारा ‘शेतकºयांचा आसूड’ हे ग्रंथ आपण वाचले पाहिजे. जात, पुण्यतिथी, जयंती यापलीकडे आपण राष्ट्रपुरुषांना घेऊनच गेलो नाही. महाराष्ट्रात जलसंधारणाची हाक माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी दिली. स्वच्छता अभियानाची हाक आर. आर. पाटील यांनी दिली. स्वातंत्र्याच्या क्रांतीची हाक नाना पाटील यांनी दिली. रोजगार हमी योजनेची हाक वि. स. पागे यांनी दिली.
या मातीत क्रांतीची मोठी शक्ती आहे. यापुढे राजकीय सत्ता ज्याची, तिकडेच पाणी पळणार आहे. त्यामुळे कृषी विकास आणि ग्राम विकास संघटना जिवंत ठेवणे गरजेचे आहे.