दुष्काळाऐवजी गटबाजीवरच मोठी चर्चा

By admin | Published: March 27, 2016 11:36 PM2016-03-27T23:36:14+5:302016-03-28T00:15:28+5:30

विटा कॉँग्रेस मेळावा : कार्यकर्त्यांतील मतभेद संपविण्याचे आव्हान

Big talk on grouping instead of drought | दुष्काळाऐवजी गटबाजीवरच मोठी चर्चा

दुष्काळाऐवजी गटबाजीवरच मोठी चर्चा

Next

दिलीप मोहिते ल्ल विटा
खानापूर तालुका कॉँग्रेस पक्षाने शनिवारी विटा येथे दुष्काळ निवारणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दुष्काळाऐवजी तालुक्यातील गटबाजीवरच मोठी चर्चा झाली.
ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना टार्गेट करीत तुमच्याच काखेतील व पुढे पुढे करणारे आणि स्वत:ला निष्ठावान समजणाऱ्या काही कार्यकर्त्यांमुळेच तालुक्यातील कॉँग्रेसमध्ये गटबाजी वाढल्याचे स्पष्टपणे बोलून दाखवित ज्यांना निवडणुकीसाठी उमेदवारी पाहिजे, अशा इच्छुकांनी पहिल्यांदा व्यासपीठावरील सर्व नेत्यांना श्री रेवणसिध्द मंदिरात नेऊन पक्षासाठीच प्रामाणिकपणे काम करण्याची शपथ द्यावी, असा टोलाही लगावला. त्यामुळे खानापूर तालुक्यातील कॉँग्रेसअंतर्गत कार्यकर्त्यांतील मतभेद संपविण्याचे मोठे आव्हान आगामी काळात नेत्यांना पेलावे लागणार आहे.
विट्यात शनिवारी माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा दुष्काळ निवारणासाठी मेळावा झाला. मेळावा दुष्काळ निवारणासाठी होता. परंतु, त्यात चर्चा रंगली ती विटा शहरासह तालुक्यातील कॉँग्रेसमधील गटबाजीची.
या मेळाव्यात पहिल्यांदाच नेहमीप्रमाणे ध्वनीक्षेपक हातात घेऊन आ. डॉ. कदम यांनी कोण कधी बोलणार, याचा खुलासा केला. ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यांना प्रथम बोलण्याची संधी दिली. त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी विधानसभेला कॉँग्रेस उमेदवाराचा झालेला पराभव हा पक्षातील कार्यकर्त्यांमुळेच झाल्याचा उल्लेख केला.
माजी आ. सदाशिवराव पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाने खचून गेलो नाही. परंतु, आपल्याच पक्षाचे निष्ठावान समजणारे कार्यकर्तेच चौकात बसून पक्षाच्या विरोधात बोलतात. हे मोठे दुर्दैव असल्याचे सांगून कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्याव्यात, असे सूचित केले व डॉ. कदम यांनी पुढाकार घेऊन पक्षाच्या मजबुतीसाठी तालुक्याचे नेतृत्व करावे, असे सांगून गटबाजी संपविण्याचा चेंडू डॉ. कदम यांच्याकडे टोलविला.
वासुंबेच्या जयदीप पाटील यांनी तर व्यासपीठावरील नेत्यांवरच अविश्वास दाखविला. विटा नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आल्या आहेत. ज्यांना उमेदवारी पाहिजे त्यांनी पहिल्यांदा नेत्यांना गाडीत घालून रेवणसिध्द मंदिरात घेऊन जावे व तेथे त्यांना शपथ द्या, मगच उमेदवारी करा, तरच गटबाजी संपेल, असा टोला लगावला.
विट्यात शनिवारी झालेल्या कॉँग्रेसच्या मेळाव्यात माजी आ. सदाशिवराव पाटील, अशोकराव गायकवाड व माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील हे एकाच व्यासपीठावर होते. गायकवाड व नंदकुमार पाटील हे डॉ. कदम यांचे निष्ठावान समजले जातात. परंतु, त्यांनीच आता पालिकेच्या निवडणुकीसाठी तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याने शनिवारच्या मेळाव्याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते.
परंतु, डॉ. कदम यांनी विटा नगरपालिकेची निवडणूक कॉँग्रेस पक्षच लढविणार असल्याने सर्वांनी एकमेकांची जिरवाजिरवी बंद करून एकसंध रहावे, असा सल्ला दिला असला, तरी विटा शहरासह तालुक्यातील कॉँग्रेसमधील गटबाजी संपविण्याचे मोठे आव्हान यापुढील काळात डॉ. पतंगराव कदम यांना पेलावे लागणार आहे, हे मात्र निश्चित.

कदम गटाचा मेळावा : सदाभाऊ गटाची छाप..!
खानापूर तालुक्यात कॉँग्रेसमध्ये सदाशिवराव पाटील व मोहनराव कदम असे दोन गट आहेत. कदम गटाने विधानसभा व विटा बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान आ. अनिल बाबर यांना मदत केली. याचा राग सदाभाऊ समर्थकांना होताच. शनिवारी आ. डॉ. कदम यांनीच मेळावा घेण्याचे फर्मान काढले आणि आयतीच संधी सदाभाऊ समर्थकांना मिळाली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावरच आपली खदखद व्यक्त करीत ‘निष्ठावान’ कोण? व पक्ष कसा वाढवायचा? असे प्रतिप्रश्न करून डॉ. कदम यांनाच कोंडीत पकडले. त्यामुळे डॉ. कदम यांनीच आयोजित केलेल्या मेळाव्यात सदाभाऊ समर्थकांची छाप दिसली.


कार्यकर्ते बाजारात मिळत नाहीत
बैठकीत किसन निकम यांनी कार्यकर्ते बाजारात विकत मिळत नाहीत, हे नेत्यांनी लक्षात घ्यावे. कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करीत निवडणूक आल्यानंतर नेत्यांना कार्यकर्त्यांची आठवण येते, असे सांगून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

Web Title: Big talk on grouping instead of drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.