महाकाय ‘टेंभू’ जाणार ४,८१५ कोटींवर
By admin | Published: June 7, 2017 12:17 AM2017-06-07T00:17:26+5:302017-06-07T00:17:26+5:30
महाकाय ‘टेंभू’ जाणार ४,८१५ कोटींवर
प्रताप महाडिक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : केवळ स्वत:च्या काठावरीलच नव्हे, घाटमाथ्यावरील पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या कायम दुष्काळी जनतेचा आक्रोश ऐकून कृष्णामाई उजाड माळरानावर ओलावा निर्माण करण्यासाठी टेंभूपासून सांगोल्यापर्यंत धावू लागली आहे.
दुसऱ्या सुधारित प्रकल्प अहवालाच्या मंजुरीनंतर टेंभू उपसा सिंचन योजना ४ हजार ८१५ कोटींची होत आहे. या महाकाय प्रकल्पासाठी गेल्या २२ वर्षांत एकंदरीत दोन हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या योजनेला कोयना, वांग, तारळी प्रकल्पातील २२.१३ टीएमसी पाणी कृष्णा नदीतून उचलण्याची मंजुरी आहे. ही योजना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आजच्या युगातील अफाट नमुना आहे. सातारा, सांगली आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्यांतील सात तालुक्यांतील २१० गावांतील ८० हजार ४७२ हेक्टर लाभक्षेत्राला पाणी देणारी ही योजना गरजेप्रमाणे अखंडित सुरु ठेवण्याचे आव्हान राज्यकर्ते, शासकीय अधिकारी, लाभक्षेत्रातील शेतकरी तसेच साखर कारखानदार नेत्यांसमोर उभे आहे. या आव्हानाला समन्वयाने सामोरे जाण्याचीच गरज आहे.
सद्यस्थितीत टेंभू योजनेतून सुमारे ३० हजार हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आली आहे. योजनेचा आराखडा मंजूर झाल्यानंतर १९ फेब्रुवारी १९९६ रोजी १ हजार ४१६ कोटींच्या या योजनेला मान्यता मिळाली. त्यानंतर २१०६ कोटींचा सुधारित प्रकल्प अहवाल २००४ मध्ये मंजूर झाला. आतापर्यंत या योजनेचा खर्च दोनहजार कोटी इतका झाला आहे. आता तर ही योजना पूर्ण करण्यासाठी एकंदरीत ४ हजार ८१५ कोटी इतका खर्च येणार आहे. कृष्णा नदीवर कऱ्हाडजवळील टेंभू या गावी मोठा बराज बांधून पाणी अडविले आहे. येथील ११ भल्या मोठ्या दरवाजांद्वारे पाणी अडवून हे पाणी लगतच्याच टप्पा क्रमांक १ अमध्ये सोडले आहे. टप्पा क्रमांक १ अमधून हे पाणी ६१ मीटर इतक्या खड्या उंचीवर असलेल्या टप्पा क्र. १ बमध्ये सोडले आहे. यासाठी टप्पा क्र. १ अमध्ये १९५० अश्वशक्तीचे ३३ पंप बसवण्यात आले आहेत. यापैकी १५ पंप सध्या सुरु आहेत. टप्पा क्रमांक १ बमधून हे पाणी पुन्हा ८५ मीटर उचलले जाऊन सहा महाकाय जलवाहिन्यांद्वारे खंबाळे बोगद्याच्या सुरुवातीस वितरण हौदामध्ये टाकले गेल आहे. तेथून खंबाळे बोगदा पास करून जोड कालव्याद्वारे कडेगाव तालुक्यामध्ये ते प्रवेश करते. कडेगाव तालुक्यात मुख्य कालव्याला फाटा देऊन ते शिवाजीनगर तलावात असलेल्या टप्पा क्र. २ मध्ये सोडण्यात आले आहे. टप्पा क्रमांक २ मध्ये १४०० अश्वशक्तीचे तीन पंप बसविण्यात आले आहेत. या पंपांद्वारे सुर्ली आणि कामथी कालव्यात पाणी सोडले जाते. मुख्य कालव्यातून फाट्याद्वारे हे पाणी पुढे थेट नंदणी नदीवर असलेल्या हिंगणगाव बुद्रुक तलावात सोडले आहे. तेथून गरजेप्रमाणे टेंभू योजनेचे पाणी नंदणी नदीत सोडले जाते. याच मुख्य कालव्यातून हे पाणी माहुली (ता. खानापूर) येथील टप्पा क्रमांक ३ च्या तलावात जाते.
दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये या टेंभू योजनेद्वारे कडेगाव तालुक्यामध्ये अत्यंत दुष्काळी अशा पट्ट्यात लाभक्षेत्रातील २५ गावांना शेतीसाठी पाणी दिले आहे. आता ऐन उन्हाळ्यात लहान-मोठे तलाव भरून घेतले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न सुटला आहे. हे पाणी माहुली पंपगृहापासून पुढे प्रवास करीत खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि सांगोला तालुक्यांत गेले आहे. टप्पा क्र. १ अ, १ ब, २, ३, ४, ५ असे सहा टप्पे आहेत. याच योजनेवर पुणदी आणि विसापूर या उपसा सिंचन योजना कार्यान्वित आहेत.
कृष्णामाई एक्स्प्रेस :
टेंभू ते सांगोला तब्बल दोन हजार कोटी रुपये खर्चूनही पूर्ण न झालेली आणि पावणेपाच हजार कोटी खर्चावर पोहोचलेली टेंभू उपसा जलसिंचन योजना आता औत्सुक्याचा विषय ठरली
आहे.
या योजनेमुळे सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळी सात तालुक्यांतील ८० हजार हेक्टर क्षेत्र भिजणार आहे. १९९६ मध्ये प्रत्यक्ष खर्चाला मान्यता मिळाल्यानंतर २१ वर्षांनंतरही ही योजना पूर्ण झालेली नाही.
या योजनेचा प्रवास, प्रत्यक्ष मार्ग, महाकाय यंत्रणा, पाणी वितरण व्यवस्था, सद्यस्थिती, पाणीपट्टी वसुली, योजनेपुढील अडचणी-संकटे, पुढील टप्पे रखडण्याची कारणे, उपाययोजना यांचा ऊहापोह करणारी ही मालिका आजपासून...
सद्यस्थितीत असलेले कालवे आणि लांबी
सुर्ली (२३ कि.मी.), कामथी (१६ कि.मी. ), भरण कालवा टप्पा क्रमांक १ ते हिंगणगाव (१५ कि.मी.), हिंगणगाव ते येरळा नदी (२४ कि.मी.), येरळा नदी ते टप्पा क्र. ३ (८ कि.मी.), टप्पा क्र. ३ ते घाणंद ( १८ कि. मी.), आटपाडी कालवा (१५ किलोमीटर), घाणंद ते हिवतड ३२ कि.मी., सांगोला (५० कि.मी.), कवठेमहांकाळ (कालवा ४१ किलोमीटर) अशा १० कालव्याद्वारे २४२ कि.मी. सांगोल्यापर्यंत आणि टप्पा क्र. ३ बमधून भाग्यनगर तलाव (१२ कि.मी.) असा एकंदरीत ३५० किलोमीटर अंतराचा दीर्घ प्रवास करीत कृष्णामाई धावत आहे. विविध टप्प्यात एकंदरीत ६४० मीटर पाणी उचलून दुष्काळी भागाला दिले आहे.