सांगलीत ‘पद्मावत’ला मोठा बंदोबस्त; पोलिसांकडून पाहणी : थिएटर मालकांकडूनही सतर्कता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 08:31 PM2018-01-24T20:31:06+5:302018-01-24T20:31:44+5:30
सांगली : ‘पद्मावत’ चित्रपटाच्या गुरुवारी होणाºया प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी बुधवारी सुरक्षेचा आढावा घेतला. मोठ्या बंदोबस्तात आता हा चित्रपट प्रदर्शित होणार असून थिएटर मालकांनीही याबाबत सतर्कता बाळगली आहे.
सांगली : ‘पद्मावत’ चित्रपटाच्या गुरुवारी होणाºया प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी बुधवारी सुरक्षेचा आढावा घेतला. मोठ्या बंदोबस्तात आता हा चित्रपट प्रदर्शित होणार असून थिएटर मालकांनीही याबाबत सतर्कता बाळगली आहे. श्री शिवप्रतिष्ठानने या चित्रपटाला विरोध दर्शविला असून कोणीही भारतीयांनी हा चित्रपट पाहू नये, असे आवाहनही केले आहे.
सांगलीत एक महिन्यापूर्वीच शिवप्रतिष्ठानने मोर्चा काढून ‘पद्मावत’ चित्रपटाचे प्रदर्शन सांगलीत करण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. शिवप्रतिष्ठान व अन्य संघटनांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवारीच सर्व थिएटरमधील चित्रपटाच्या प्रदर्शनाची माहिती घेतली. प्रयोगाच्या वेळा नोंदवून त्याप्रमाणे बंदोबस्तही तैनात केला आहे. मल्टिप्लेक्सना प्रत्येकी १५ पोलिसांचा बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. सिंगल स्क्रीन थिएटरनाही त्यांच्या प्रयोगांच्या प्रमाणात बंदोबस्त देण्यात आला आहे. थिएटर मालकांशीही पोलिसांनी चर्चा केली आहे. त्यांनीही सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सांगलीतील मुक्ता, न्यू प्राईड आणि स्वरुप या चित्रपटगृहांमध्ये बुधवारी पेड प्रिव्'ुव (सशुल्क पूर्वावलोकन) प्रयोग सादर झाले. यालाही मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.
गुरुवारी, २५ जानेवारी रोजी अधिकृतरित्या चित्रपटांचे नियमित खेळ होणार असल्याने गुरुवारपासून अधिक बंदोबस्त देण्यात येणार आहे. पोलिसांनी सातत्याने चित्रपटगृह मालकांशी संपर्क साधला आहे. अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी सांगितले की, बंदोबस्ताबरोबरच दंगल नियंत्रण आणि बॉम्बशोधक पथक तैनात केले आहे. चित्रपट जोपर्यंत थिएटरला आहे, तोपर्यंत बंदोबस्त ठेवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
चित्रपट न पाहण्याचे आवाहन!
शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी बुधवारी याबाबतची संघटनेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, या चित्रपटाला आमचा पूर्ण विरोध आहे. परकीय आक्रमणकर्ता व क्रूरकर्मा अल्लाउद्दीन खिलजी याचे उदात्तीकरण करतानाच, महाराणी पद्मावती व हिंदू धर्माचा अवमान या चित्रपटातून झाला आहे. त्यामुळे भारतीयांनी हा चित्रपट पाहू नये. लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन चित्रपटाची निर्मिती आणि प्रदर्शन केले जात आहे. आम्ही या चित्रपटाचा आणि निर्माते, दिग्दर्शक यांचा निषेध करीत आहोत, असे चौगुले म्हणाले.