दुचाकी चोरट्यांच्या टोळीस पकडले
By admin | Published: July 16, 2015 11:21 PM2015-07-16T23:21:32+5:302015-07-16T23:21:32+5:30
चौघांचा समावेश : १५ दुचाकी जप्त; कऱ्हाड, तासगाव तालुक्यातून चोरी
सांगली : रुग्णालय, महाविद्यालय, चित्रपटगृह यांसह गर्दीच्या ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले आहे. टोळीतील चौघांना अटक केली आहे. यामध्ये एका अल्पवयीन संशयिताचा समावेश आहे. त्यांच्याकडून चोरलेल्या १५ दुचाकी जप्त केल्या आहेत. या दुचाकी त्यांनी तासगाव, कऱ्हाड तालुक्यातून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.अटक केलेल्यांमध्ये अमोल अधिक आपटे (वय २५, रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड), अजित नारायण मोहिते (२४) व अमोल चंद्रकात काळे (२८, दोघे रा. मांजर्डे, ता. तासगाव) व कऱ्हाड (जि. सातारा) येथील एक अल्पवयीन संशयित यांचा समावेश आहे. तिघांना न्यायालयाने १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गस्त घालणाऱ्या पोलीस पथकास हे चारही गुन्हेगार संशयितरित्या फिरताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सापडलेल्या दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर, त्यांनी तासगावमधून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. एकापाठोपाठ एक अशा तब्बल १५ दुचाकी चोरल्याची त्यांनी कबुली दिली. चोरलेल्या दुचाकीचा क्रमांक बदलून त्यांनी पाच ते सात हजारात तिची विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. चैनी आणि मौजमजा करण्यासाठीच त्यांनी दुचाकी चोरल्याचे स्पष्ट झाले आहे.
कऱ्हाड येथून चोरलेल्या दुचाकींची तासगाव, मांजर्डे परिसरात विक्री केली आहे, तर तासगावमधून चोरलेल्या दुचाकींची कऱ्हाड तालुक्यात विक्री केली आहे.
गुरुवारी दिवसभर पोलिसांनी संशयितांना घेऊन, ज्यांना त्यांनी दुचाकी विक्री केली आहे, त्यांची भेट घेऊन त्या जप्त करण्याची कारवाई सुरु केली आहे. दुचाकी खरेदी करणाऱ्यांना साक्षीदार करण्याचे काम सुरू आहे. संशयितांविरुद्ध सातारा जिल्ह्यात दुचाकी चोरीचे गुन्हे नोंद आहेत का, याचीही माहिती घेण्याचे काम सुरु आहे. यासाठी एक पथक रवाना करण्यात आले होते. रात्री उशिरा हे पथक सांगलीत दाखल झाले. (प्रतिनिधी)
तपासाबाबत गोपनीयता
चोरट्यांची टोळी हाताला लागली आहे. त्यांना रितसर अटक करुन पोलीस कोठडीही घेण्यात आली आहे. जप्त केलेल्या १५ दुचाकी पोलीस ठाण्यासमोर लावण्यात आल्या आहेत. तरीही याची प्रसारमाध्यमांना माहिती देण्याबाबत पोलिसांकडून टाळाटाळ केली जात आहे. पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही, तपास सुरु आहे, अद्याप दुचाकी जप्त करण्याची कारवाई सुरु आहे. तपासाची व्याप्तीही वाढत आहे. संपूर्ण तपास झाल्यानंतर सर्व माहिती देऊ, असे सांगितले.
संयशितांची पोलीस कोठडीची शुक्रवारी मुदत संपणार आहे. यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात उभे करुन पोलीस कोठडीची मागणी केली आहे. अल्पवयीन संशयिताचे बालसुधारगृहात रवानगी होणार आहे.