भीमरावतात्या पतसंस्था गुंडाळली
By admin | Published: July 21, 2014 11:44 PM2014-07-21T23:44:23+5:302014-07-21T23:44:23+5:30
इस्लामपुरात कारवाई : संस्थेवर अवसायक नियुक्त
इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील भीमराव जाधव (तात्या) पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून येथील सहाय्यक निबंधक सचिन गायकवाड यांनी पतसंस्थेवर अवसायकाची नियुक्ती केली आहे. भारतीय नागरी पतसंस्थेनंतर अवसायनात निघालेली भीमराव जाधव पतसंस्था ही दुसरी ठरली आहे.
ही पतसंस्था अवसायनात काढताना सहाय्यक निबंधक सचिन गायकवाड यांनी भीमराव जाधव (तात्या) पतसंस्थेच्या कारभाराबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर २०१३ अखेरची आर्थिक पत्रके, लेखापरीक्षण अहवालाची प्रत मागितली होती. मात्र पतसंस्थेने ही माहिती आणि त्यासंबंधीचा खुलासाही सादर केला नाही. त्यानंतर त्यांना वेळोेवेळी नोटीस देऊनही माहिती द्यायला टाळाटाळ केल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे. २००३ मध्ये स्थापन झालेल्या या पतसंस्थेचा कारभार सहकार कायद्यानुसार न चालल्याने या संस्थेचे कामकाज गुंडाळून तिचे संस्था म्हणून असणारे अस्तित्व संपविणे कायद्यानुसार आवश्यक असल्याचे निष्कर्ष गायकवाड यांनी आदेशात काढले आहेत. त्यानुसार त्यांनी ही पतसंस्था अवसायनात काढण्याचा आदेश कायम केला. याचवेळी त्यांनी सहकारी अधिकारी वाय. पी. पाटील यांची अवसायक म्हणून नियुक्ती केल्याचे स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)