शिक्षक बँकेवर विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:25 AM2021-03-26T04:25:51+5:302021-03-26T04:25:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संख : जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी संचालकांनी सभासद हितासाठी घेतलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी संचालकांनी सभासद हितासाठी घेतलेल्या पोटनियम दुरुस्ती विषयामुळे विरोधकांचा पोटशूळ उठला आहे. हतबल व सैरभैर झाल्याने बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, असे मत शिक्षक समितीचे नेते धरेप्पा कट्टीमनी यांनी व्यक्त केले.
जत तालुक्यातील सभासद व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. धरेप्पा कट्टीमनी म्हणाले, शिक्षक समितीच्या सत्ताकाळात बँकेने स्पर्धेला तोंड देत नेत्रदीपक प्रगती साधली आहे. त्यामुळेच सभासदांनी पुरोगामी सेवा मंडळाच्या नेतृत्वाखालील शिक्षक समितीच्या हातात दुसऱ्यांदा कारभार सोपविला आहे. विश्वासाला पात्र राहत विद्यमान सत्ताधारी संचालकांनी मृत सभासद संजीवनी योजना, स्टँप ड्यूटी माफ करणे, कर्जावरील व्याजदरात दोनदा केलेली कपात, डीसीपीएस धारकांच्या मदतीसाठी केलेली वाढीव मदत आदी सभासद हिताच्या निर्णयांमुळे शिक्षक समिती आगामी निवडणुकीत बाजी मारणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोरोना संकटामुळे संपूर्ण देशभरातील सर्व सहकारी बँकांना लाभांश वाटपास रिझर्व्ह बँकेने मनाई केलेली आहे. नव्याने कर्ज घेणाऱ्या सभासदाने जर पंचवीस लाख रुपये कर्ज घेतले तर सध्या त्याची सहा टक्के प्रमाणे दीड लाख रुपये शेअर्स कपात केली जाते. त्यामध्ये पोटनियम दुरुस्तीनंतर पाच टक्के शेअर्स कपातीनुसार पंचवीस हजार रुपये शेअर्स कपात कमी होणार आहे. त्यामुळे सभासदांचा दीर्घकालीन फायदा होणार असल्याने विरोधकांच्या भूलथापांना ते बळी पडणार नाहीत.