जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी जैवविविधता पार्क उभारणार
By admin | Published: February 11, 2016 11:22 PM2016-02-11T23:22:29+5:302016-02-11T23:33:28+5:30
शेखर गायकवाड : खंबाळे व बोलवाडला प्रकल्प होणार
सांगली : सामाजिक वनीकरण विभागातर्फे नव्याने राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजनांनुसार उत्तमराव पाटील वन उद्यान निर्मिती योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याव्दारे जैवविविधता व निसर्ग संरक्षण करणाऱ्या योजनांचा समावेश असून, यातून जिल्ह्यातील खंबाळे (ता. खानापूर) व बोलवाड (ता. मिरज) याठिकाणी जैवविविधता पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी गायकवाड यांनी सांगितले की, शासनाच्या निर्णयानुसार सामाजिक वनीकरणातर्फे सहा महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार असून, यातील उत्तमराव पाटील वन उद्यान निर्मिती योजनेतून जिल्ह्यात वन व वनेतर जमिनीवर जैवविविधता व निर्सग संवर्धनासाठीचे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. येत्या तीन वर्षात हे प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत.
योजनेचे स्वरुप स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात दोन असे ६८ उद्याने उभारण्यात येणार असून, यात पर्यावरणपूरक उपकरणे उभारणी करून निसर्ग संवर्धनाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उद्यानात औषधी वनस्पती उद्याने, फुलपाखरू उद्यान, दिशा उपदिशा उद्यान, स्मृतिवने, सुगंधीद्रव्य उद्यान, बांबू सेटम, काटेरी झुडपी वृक्ष समूह यातून पर्यावरण अभ्यासास चालना देण्यात येणार आहे. याठिकाणी मुलांसाठी मनोरंजन खेळणी, ज्येष्ठ नागरिकांना विश्रांती व फिरण्यासाठी निसर्ग पायवाटा आदी सुविधा पुरविण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी तासगाव विटा मार्गावरील खंबाळे येथील व बोलवाड (ता. मिरज) येथील ११ एकर जागेची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांच्या निधी प्राप्त झाला असून, आठवडाभरात कामास सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सामाजिक वनीकरणचे उपसंचालक विश्वास जवळेकर, प्रमोद चौगुले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)