जिल्ह्यात बर्ड फ्लूबाबत सतर्कतेचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:25 AM2021-01-08T05:25:06+5:302021-01-08T05:25:06+5:30
सांगली : अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूने चिंता वाढविली असून, जिल्ह्यात त्याचा संसर्ग कुठेही आढळून आलेला नाही. तरीही सतर्कतेचे आदेश ...
सांगली : अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूने चिंता वाढविली असून, जिल्ह्यात त्याचा संसर्ग कुठेही आढळून आलेला नाही. तरीही सतर्कतेचे आदेश जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी दिले आहेत.
महाराष्ट्रातही अद्याप कोठेही संसर्ग आढळलेला नाही. तरीही राज्यात सर्वत्र दक्षता घेतली जात आहे. सांगली जिल्ह्यातही प्रशासनही त्याबाबत सतर्क झाले आहे.
जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांना अलर्ट करण्यात आले आहे. दक्षता म्हणून विटा परिसरात सुमारे २०० कोंबड्यांचे नमुने घेतले जात आहेत. प्रत्येक तालुक्यात पोल्ट्रीच्या ठिकाणी पाच-दहा नमुने घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ. पराग यांनी दिली.
पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रतापसिंह, सहआयुक्त डॉ. लिमये यांनी बुधवारी याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. सांगलीतून उपायुक्त डॉ. संजय धकाते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभाग घेतला. सचिंद्रप्रतापसिंह यांनी दक्षतेच्या सूचना दिल्या.