जन्म-मृत्यूचे दाखले आता शासकीय रुग्णालयातच मिळणार, नागरिकांचे हेलपाटे वाचणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 04:33 PM2022-05-21T16:33:57+5:302022-05-21T16:34:47+5:30
पहिली प्रत मोफत असणार असून त्यापेक्षा अधिक प्रतीला पाच रुपये आकारले जाणार आहेत.
शरद जाधव
सांगली : जन्म अथवा मृत्यू प्रमाणपत्रासाठी संबंधित महानगरपालिका, नगरपालिकेेतील हेलपाटे आता थांबणार आहे. शासनाच्या आदेशानुसार आता जन्म किंवा मृत्यू ज्या शासकीय रुग्णालयात झाला त्याच रुग्णालयात विहीत वेळेनंतर दाखला मिळणार आहे. पहिली प्रत मोफत असणार असून त्यापेक्षा अधिक प्रतीला पाच रुपये आकारले जाणार आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयात याची नोंदणीची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
कोणत्याही रुग्णालयात जन्म अथवा मृत्यूची घटना घडल्यास त्याची महानगरपालिका, नगरपालिका अथवा ग्रामपंचायतीमध्ये नोंद होत असते. संबंधितांना दाखले हवे असल्यास महिनाभरानंतर त्या त्या कार्यालयात हेलपाटेही मारावे लागत असत. शासनाच्या या निर्णयानुसार आता ज्या रुग्णालयात ही घटना घडली त्याच रुग्णालयात २१ दिवसानंतर हे दाखले नागरिकांना मिळणार आहेत.
पाच रुपयांचा दाखला शंभर रुपयांना प्रकार थांबणार
महापालिका अथवा नगरपालिकेत दाखल्यासाठी नियमानुसार असलेली रक्कम तर घेतली जातेच शिवाय त्यापेक्षा अधिक चिरीमिरीसाठी अडवणुकीचेही प्रकार होत असतात. आता जुन्या दाखल्याशिवाय काही काम नसून, सर्व नोंद रुग्णालयातच असणार आहे.
कर्मचाऱ्यांची वाणवा
शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अगोदरच कमी आहे. त्यात या निर्णयाची अंमलबजावणी करताना किमान चार ते सहा कर्मचाऱ्यांची या कक्षाकडे नेमणूक करावी लागणार आहे. मात्र, कर्मचारी संख्या कमी असल्याने रुग्णालय प्रशासनाची अडचणच होणार आहे.
२१ दिवसानंतर दाखले मिळणार
जन्म अथवा मृत्यूची घटना झाल्यानंतर त्वरित दाखले मिळणार नसून, त्याची नोंद व इतर माहिती संकलित करणे आवश्यक आहे. त्यामुळे २१ दिवसानंतर हे दाखले मिळणार आहेत.
लूट थांबणार का?
जन्म, मृत्यू दाखल्यासाठी नेहमीच नागरिकांची लुबाडणूक करण्यात येते. पाच रुपयांच्या दाखल्यासाठी ताटकळत थांबवून पैसेही काढले जातात. आता ही सोय रुग्णालयात होणार असली तरी ही लूट थांबणार का? हा सवाल कायम आहे.
शासन निर्देशानुसार रुग्णालयातच जन्म, मृत्यू नोंदणी करुन दाखल्यांचे वितरण केले जाणार आहे. एक मेपासून याची नोंद सुरू झाली असून, विहीत वेळेनंतर दाखले रुग्णालयातच देण्याची सोय करण्यात आली आहे. - डॉ. नंदकिशोर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय रुग्णालय, सांगली.