बाबासाहेबांच्या जयंतीसाठी ती आली बेल्जियमहून
By admin | Published: April 14, 2016 10:48 PM2016-04-14T22:48:32+5:302016-04-15T00:50:10+5:30
खटावच्या माहेरवाशिणीची कहाणी : परदेशी पतीही वातावरणाने भारावला--गावकऱ्यांनाही त्यांचे अप्रूप
प्रताप महाडिक-- कडेगाव --आयुष्यभराचे सोबती झालेले ‘ते’ दोघे बेल्जियमहून थेट ‘तिच्या’ माहेरी खटाव तालुक्यात आले, ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’, असा संदेश देणाऱ्या महापुरुषाच्या जयंतीसाठी! गुरुवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आलेले हे जोडपे भेटले कडेगाव-खटावच्या सीमेवर. स्वाती कांबळे आणि पप्पेन हंसेन्स हे या दाम्पत्याचे नाव. स्वातीच्या मनात असलेली बाबासाहेबांच्या जयंतीची आस पाहून पप्पेन भारावून गेले...पूर्वाश्रमीची स्वाती मुकंद कांबळे ही सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंधच्या पायथ्याशी असलेल्या त्रिमली या गावची. तिचा जन्म मुंबईत झाला आणि शिक्षणही तिथेच झाले. वडील गिरणी कामगार. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने शिक्षण घेतले. बाबासाहेबांच्या विचाराने भारावलेली स्वाती कधीच खचली नाही. बाबासाहेबांचा शिक्षणाचा मंत्र तिला गप्प बसू देत नव्हता. मुंबई येथे निर्मला निकेतनमधून पदवीधर झालेली स्वाती पुढील शिक्षणासाठी स्वित्झर्लंडला गेली. तत्पूर्वी भारतीय दलित महिलांवरील अन्याय-अत्याचाराने ती सुन्न झाली होती आणि तोच तिच्या अभ्यासाचा विषयही झाला. स्वित्झर्लंड येथे जीनिव्हा विद्यापीठात ती सध्या पीएच.डी. करीत आहे. बीड आणि लातूर जिल्ह्यातील दलित महिलांवरील अन्याय, अत्याचाराबाबत तिने सर्वेक्षण करून प्रबंध सादर केला आहे. दरम्यान, तिला स्वित्झर्लंडमध्ये बेल्जियम येथील पप्पेन हंसेन्स भेटले. स्वातीच्या बेल्जियममधील मैत्रिणीने पप्पेन यांची ओळख करून दिली. ओळखीचे प्रेमात आणि प्रेमाचे विवाहात रूपांतर झाले. पप्पेनशी तिने १२ डिसेंबर २०१५ रोजी तेथेच नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यानंतर नुकताच म्हणजे १५ दिवसांपूर्वी मुंबई येथे बौद्ध पध्दतीने विवाह केला. या विवाहास दोघांच्याही नातेवाईकांनी पाठिंबा दिला. बेल्जियम सरकारमध्ये नोकरी करणाऱ्या पप्पेन यांना सामाजिक कार्याची विलक्षण आवड आहे. रात्रंदिवस ते बालकामगारांच्या प्रश्नात व्यस्त असतात. भारतातील संस्कृतीने आपण भारावून गेल्याचे ते सांगतात. डॉ. बाबासाहेबांच्या विचारधारेशी आपण स्वातीमुळे जोडलो गेलो असल्याचेही त्यांनी सांगितले. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत वेळ व्यतित करायचा, असे ठरवून दोघेही त्रिमलीला भेट देण्यासाठी आले होते. (वर्ताहर)
कडेपूर-पुसेसावळी रस्त्यावर कडेगाव-खटाव तालुक्याच्या सरहद्दीवर एका कालव्यात पप्पेन यांना पोहण्याचा मोह टाळता आला नाही. गुरुवारी सगळीकडे निर्माण झालेले ‘भीममय’ वातावरण पाहून आणि स्वातीची आस पाहून ते भारावून गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा जगभरात रुजण्याची गरज आहे, असे पप्पेन व स्वाती यांनी सांगितले. विशेष म्हणजे दोघांनाही समाजसेवा करून बालकामगारांचे अश्रू पुसायचे आहेत. त्यांच्या व्यथा-वेदनांवर फुंकर घालायची आहे. त्यांच्या या जिद्दीचे कडेगाव-खटाव तालुक्यातील गावकऱ्यांना अप्रूप वाटले नसते तरच नवल!