वाढदिवस जयंतरावांचा, चर्चा कृष्णाच्या निवडणुकीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 12:29 PM2020-02-21T12:29:42+5:302020-02-21T12:30:52+5:30
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून कृष्णाच्या आजी-माजी तिन्ही अध्यक्षांनी जयंतरावांना शुभेच्छा दिल्या.
निवास पवार
शिरटे : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून कृष्णाच्या आजी-माजी तिन्ही अध्यक्षांनी जयंतरावांना शुभेच्छा दिल्या.
या वाढदिवसाला तिन्ही अध्यक्षांची उपस्थिती राहिल्याने,कृष्णाच्या परिसरात चर्चेला उधाण आले आहे. वाढदिवस जयंतरावांचा, चर्चा मात्र कृष्णाच्या निवडणुकीचीच जोरदार सुरु असल्याने, येणाऱ्या निवडणुकीत जयंतरावांची भूमिका काय असणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड ) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक मे-जून च्या दरम्यान होत आहे. निवडणुकीला अवधी असला तरी, कृष्णाच्या परिसरात मात्र आतापासूनच आरोपांच्या फैरी उडू लागल्या आहेत.
विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, संस्थापक पॅनेलचे नेते अविनाश मोहिते व रयत संघर्ष मंचचे डॉ. इंद्रजित मोहिते यांनी कृष्णाच्या कार्यक्षेत्रात संपर्क दौरे सुरु केले आहेत. नुकत्याच झालेल्या जयंत पाटील यांच्या वाढदिवसाला राजारामबापू कारखाना कार्यस्थळावर आपापल्या सोयीनुसार तिन्ही आजी-माजी अध्यक्षांनी मंत्री पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
कृष्णाचे जवळपास ४९ हजार सभासद असून कऱ्हाड, खानापूर, कडेगाव तालुक्यासह वाळवा तालुक्यातील ४२ गावांचा समावेश कृष्णाच्या कार्यक्षेत्रात होतो. अपवाद वगळता सर्वच गावांवर मंत्री जयंत पाटील यांचेच वर्चस्व आहे. त्यामुळे भोसले-मोहिते या तिन्ही गटांना, जयंत पाटील यांची निवडणुकीत साथ मिळावी, हीच अपेक्षा राहणार हे साहजिकच .
कृष्णाच्या निवडणुकांचा मागोवा घेतला, तर मंत्री पाटील यांनी आजपर्यंत कधीच उघड भूमिका घेतलेली नाही. कृष्णाच्या राजकारणातील तिन्ही गटात त्यांचेच कार्यकर्ते विखुरलेले आहेत. त्यामुळे मंत्री पाटील यांची भूमिका ही तटस्थच राहिली आहे.
विद्यमान डॉ. सुरेश भोसले गट भाजप, अविनाश मोहिते राष्ट्रवादी व डॉ. इंद्रजित मोहिते कट्टर काँग्रेसप्रेमी आहेत. त्यामुळे येणारी निवडणूक पक्षीय पातळीवर होणार, की स्थानिक गटा-तटावर, यावर बरेच काही अवलंबून आहे.
कृष्णाच्या निवडणुकीत तिन्ही गटातील कार्यकर्त्यांना आपलेसे वाटणारे मंत्री जयंत पाटील यांचा कल मात्र कोणत्या गटाकडे असतो, हे एक न उलगडणारे कोडेच आहे. जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कृष्णाच्या निवडणुकीच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.