पराभव दिसल्याने भाजपवर आरोप

By admin | Published: January 17, 2017 12:45 AM2017-01-17T00:45:58+5:302017-01-17T00:45:58+5:30

रवी अनासपुरे : सांगलीतील कार्यकर्ता बैठकीत भाजप नेत्यांकडून स्वबळाचा नारा

The BJP accuses the defeat of being defeated | पराभव दिसल्याने भाजपवर आरोप

पराभव दिसल्याने भाजपवर आरोप

Next



सांगली : पराभव दिसू लागल्याने राष्ट्रवादी नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच ते आता भाजपवर गुंडगिरीचा आरोप करीत आहेत, असा टोला भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनी सोमवारी भाजपच्या बैठकीत लगावला.
भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा सांगलीतील टिळक स्मारक मंदिरात पार पडला. या मेळाव्यास पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप, आमदार शिवाजीराव नाईक, पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, पक्षाचे समन्वयक मकरंद देशपांडे, बंडोपंत देशमुख, प्रकाशतात्या बिरजे आदी उपस्थित होते.
अनासपुरे म्हणाले की, भाजपवर आता कोणत्याही प्रकारचे आरोप होऊ लागल्याने तो एक चांगला संकेत समजला पाहिजे. विरोधकांना आता भाजपवर काय टीका करायची, याचेही भान राहिलेले नाही. भाजप हा गुंडांचा पक्ष असल्याचे सांगून राष्ट्रवादी नेत्यांनी त्यांच्या खच्चीकरणाचा दाखला दिला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी ताकदीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे गड सर करावेत.
आमदार विलासराव जगताप म्हणाले, जत तालुक्यातील भाजपसह सर्वच घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती, शेतकरी संघटना, रासप, सेना यासह भाजपच्या घटक पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रण दिले होते; मात्र या बैठकीला घटक पक्षाचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. आमची तयारी झाल्यानंतर आता घटक पक्षाचे पदाधिकारी आमच्याशी चर्चा करू लागले आहेत. आमचा चांगला उमेदवार काढायचा आणि घटक पक्षातील कमकुवत उमेदवार द्यायचा, हे बरोबर नाही. आमच्याकडे इच्छुक अनेकजण आहेत. सत्तेतील घटकपक्षातील लोकांना सामावून घेताना आमच्या मेरीटच्या उमेदवारांना डावलले तर चालणार नाही. मेरीट असणाऱ्या कुणालाही उमेदवारी द्या, पण चिन्हावरच लढवा.
शिवाजीराव नाईक म्हणाले, आतापर्यंत आमच्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम केले. पक्षासाठी, सामान्यांसाठी राबणाऱ्यांना संधी देणे गरजेचे आहे. अशांना डावलले तर कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होईल. पक्षश्रेष्ठींनी याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी. कासेगाव मतदारसंघात वाळवा तालुक्यातील सर्व नेते येतात, त्यांच्याशी आम्ही झुंज देत आहोत. अशावेळी घटक पक्षाला त्याठिकाणी संधी दिला, तर आम्ही काय करायचे? मर्यादित स्वरुपात मेरीटवर चर्चेस हरकत नाही. दोन्ही काँग्रेस आमचा उमेदवार पाडायचा प्रयत्न करणार आहेत, याची खबरदारी घ्यावी.
मकरंद देशपांडे म्हणाले, ग्रामीण भागातील निवडणुका आजपर्यंत भाजपने फारशा गंभीर घेतलेल्या नाहीत. यावेळी भाजपचे चार आमदार, एक खासदार आणि कार्यकर्ते या बळावर जिल्हा परिषद निवडणूक जिंकण्याची मोठी संधी आहे.
पृथ्वीराजबाबा देशमुख म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भाजप ताकदीने लढविणार असून, याची तयारी झाली आहे. लवकरच उमेदवार निश्चित केले जातील. (प्रतिनिधी)
‘प्रसाद’ कुणी घेतला ?
आमदार नाईक म्हणाले, दोन्ही काँग्रेसचे नेते, विधानपरिषद निवडणुकीतील ‘प्रसाद’ कुणी घेतला, यावरुन आवाज उठवत आहेत. विधानपरिषदेची निवडणूक ही गैरमार्गाने लढवली, हे दोघेही काँग्रेस नेते उघडपणे सांगत आहेत. जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता बदलले आहे. यामुळे काही फरक पडणार नाही.ं

Web Title: The BJP accuses the defeat of being defeated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.