लोकसभा निवडणुकीत महायुती नावाला, निमंत्रण नाही भावाला; भाजप एकटा, राष्ट्रवादी, शिवसेनेची स्वतंत्र प्रचार यंत्रणा

By अविनाश कोळी | Published: March 22, 2024 06:16 PM2024-03-22T18:16:38+5:302024-03-22T18:17:08+5:30

पहिल्या, दुसऱ्या फळीत नाराजी

BJP Alone in Sangli Lok Sabha Elections: NCP, Shiv Sena Independent Campaign Mechanism | लोकसभा निवडणुकीत महायुती नावाला, निमंत्रण नाही भावाला; भाजप एकटा, राष्ट्रवादी, शिवसेनेची स्वतंत्र प्रचार यंत्रणा

लोकसभा निवडणुकीत महायुती नावाला, निमंत्रण नाही भावाला; भाजप एकटा, राष्ट्रवादी, शिवसेनेची स्वतंत्र प्रचार यंत्रणा

अविनाश कोळी

सांगली : लोकसभेच्या सांगली मतदारसंघात भाजप प्रचार यंत्रणा राबवीत असली तरी त्यांच्या कार्यक्रमांचे निमंत्रण महायुतीतल्या घटक पक्षांना अद्याप मिळाले नसल्याने मानापमान नाट्य रंगले आहे. राष्ट्रवादी, शिवसेना या प्रमुख मित्रपक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी युतीधर्माचे पालन होईल, असे स्पष्ट केले असले तरी पक्षातील अन्य प्रमुख नेते, पदाधिकारी मात्र, ‘बोलावणे आल्याशिवाय नाही’च्या भूमिकेवर ठाम आहेत.

भाजपने सांगली मतदारसंघात संजय पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षामार्फत तसेच संजय पाटील यांच्या समर्थकांकडून प्रचार कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात स्थानिक भाजप नेते, पदाधिकारी यांचा सहभाग दिसून येत असला तरी महायुतीतल्या घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी दिसत नाहीत.

सांगलीच्या जागेबाबत महायुतीत कोणतेही मतभेद नव्हते. त्यामुळे महायुतीचे घटक पक्ष एकत्र प्रचारात दिसण्याला काही अडचण नव्हती. उमेदवारी ज्या पक्षाला मिळाली त्या भाजपकडून मित्रपक्षांच्या नेत्यांना निमंत्रण मिळणे अपेक्षित होते. काहींना निमंत्रण मिळाले व काहींना मिळाले नाहीत. त्यामुळे छुप्या नाराजीनाट्याचा प्रयोग सुरू झाला आहे.

आघाडीतही दावेदारीमुळे नाराजी

महाविकास आघाडीत शिवसेना व काँग्रेस या दोन्ही मित्रपक्षांची सांगलीच्या जागेसाठी रस्सीखेच रंगली आहे. त्यामुळे त्यांच्यात स्पष्ट नाराजी दिसत आहे. निमंत्रण असूनही काँग्रेसचे नेते शिवसेनेच्या सभेला गैरहजर राहताना दिसत आहेत. भाजपमध्ये अशी कोणतीही रस्सीखेच जागेवरून नसतानाही निमंत्रणामुळे तसेच मित्रपक्षांच्या शिष्टाचारामुळे नाराजीचा पहिला अंक सुरू झाला आहे.

प्रचार कार्यालयावेळीही गैरहजेरी

भाजपच्या सांगलीतील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमासही मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे कार्यालयाच्या उद्घाटनालाही ते गैरहजर होते.

पहिल्या, दुसऱ्या फळीत नाराजी

राष्ट्रवादी व शिवसेनेतील प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये भाजपच्या दुर्लक्षाबाबत नाराजी आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मित्रपक्षांच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना निमंत्रण द्यायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


भाजपकडून आम्हाला प्रचार कार्यक्रमांचे निमंत्रण मिळालेले नाही. प्रचाराबाबत एकत्रित बैठकही अद्याप झालेली नाही. तरीही आम्ही मित्रपक्षाच्या कर्तव्य भावनेने स्वतंत्रपणे भाजप उमेदवाराच्या प्रचार कार्यात उतरणार आहोत. शिवसेना नेत्यांच्या सभाही याठिकाणी होतील. - आनंदराव पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना
 

भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्याकडून मला निमंत्रण मिळाले आहे. येत्या दोन दिवसांत आम्ही पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक घेऊन मित्रपक्ष या नात्याने प्रचार यंत्रणेचे नियोजन करणार आहोत. आम्ही युतीधर्माचे पालन करू. - वैभव पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

Web Title: BJP Alone in Sangli Lok Sabha Elections: NCP, Shiv Sena Independent Campaign Mechanism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.