भाजपच्या नाराजांना राष्ट्रवादीचा गळ?

By admin | Published: July 25, 2016 10:55 PM2016-07-25T22:55:43+5:302016-07-25T23:07:15+5:30

तासगाव नगरपालिकेची व्यूहरचना : नगराध्यक्ष आरक्षणावर समीकरणांची चर्चा

BJP annoyance of NCP? | भाजपच्या नाराजांना राष्ट्रवादीचा गळ?

भाजपच्या नाराजांना राष्ट्रवादीचा गळ?

Next

दत्ता पाटील --तासगाव --तासगावात सद्यस्थितीत भाजपचे एकहाती वर्चस्व आहे, तर राष्ट्रवादीचे अनेक शिलेदार भाजपमध्ये गेल्याने शहरात राष्ट्रवादी बॅकफूटवर आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून भाजपमधील नाराजांना गळ टाकल्याची चर्चा आहे. मात्र उमेदवारांची निश्चिती आणि नगराध्यक्ष आरक्षणानंतरच ऐनवेळी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुले राहिल्यास, दोन्ही पक्षांत उमेदवारीवरून राजकीय भूकंप होण्याच्या चर्चेलाही उधाण आले आहे.
तासगाव नगरपालिकेच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांत मोठे फेरबदल झाले. विशेषत: मागील सहा महिन्यांत खासदार संजयकाका गटाचा आणि पर्यायाने भाजपचा वारू सुसाट आहे. राष्ट्रवादीतील काही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शहरात भाजपचा पाया भक्कम झाला आहे. पालिकेतही एकहाती सत्ता असल्याने विकासकामांतून भाजपकडून निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणीही सुरू असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे पालिकेच्या सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच काका गटाला गटबाजीची बाधा झाली. नगराध्यक्ष निवडीवरून नाराजांचा सूर वाढला. सत्तेत आल्यापासून तीन नगराध्यक्ष झाले, तरीदेखील उर्वरित कालावधीसाठी इच्छुकांची यादी संपलेली नाही. पक्षांतर्गत गटबाजीतून काही पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे.
भाजपच्या अंतर्गत नाराजीचा फायदा घेत, राष्ट्रवादीकडून या नाराजांना गळ टाकल्याची चर्चा शहरात सुरू आहे. मात्र या नाराजांचा निर्णय उमेदवारीवर अवलंबून असल्याची चर्चा आहे.
भाजपमध्ये जुन्यांसह नव्याने पक्षात दाखल झालेल्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उमेदवारीसाठीदेखील रस्सीखेच होणार आहे. नेत्यांकडून उमेदवारी डावलल्यास राष्ट्रवादीचा पर्याय नजरेसमोर ठेवून इच्छुकांकडून चाचपणी सुरू असल्याचीही चर्चा होत आहे, तर नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुले राहिल्यास कोणाला उमेदवारी मिळणार? यावरही अनेकांनी निर्णय घेण्याची तयारी केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गळाला भाजपचे मासे लागणार की नाही? यासाठी वाट पाहावी लागणार आहे.


आरक्षण खुले पडल्यास राजकीय भूकंप?
नगराध्यक्षाची निवड थेट होणार आहे. त्यासाठीचे आरक्षण अद्याप जाहीर झाले नाही. मात्र थेट आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांत उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच होणार आहे. राष्ट्रवादीतून दोन दिग्गज पदाधिकाऱ्यांची नावे आतापासूनच चर्चेत आहेत. त्यापैकी एका पदाधिकाऱ्याने परिस्थिती पाहून भाजपशी जुळवून घेण्याची तयारी केल्याची चर्चा आहे, तर भाजपमध्येही उमेदवारी धक्कातंत्र अवलंबण्याची तयारी केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यावेळी नगराध्यक्ष आरक्षण खुले पडल्यास शहरात राजकीय भूकंप नक्की मानला जात आहे.

Web Title: BJP annoyance of NCP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.