भाजपला केबिन; राष्ट्रवादीला ठेंगा
By admin | Published: May 1, 2017 12:34 AM2017-05-01T00:34:37+5:302017-05-01T00:34:37+5:30
भाजपला केबिन; राष्ट्रवादीला ठेंगा
दत्ता पाटील ल्ल तासगाव
तासगाव नगरपालिकेत विरोधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी स्वतंत्र केबिनची मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपच्या पक्षप्रतोदांसाठी मात्र स्वतंत्र केबिन देण्यात आली आहे. या घटनेमुळे पालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांच्या कुरघोड्यांचे कारनामे रंगतदार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. केबिन नाकारल्याची घटना राष्ट्रवादीला चांगलीच झोंबली आहे.
तासगाव नगरपालिकेत आतापर्यंत केवळ नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांसाठीच स्वतंत्र केबिन होती. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आमच्या पक्षाच्या नगरसेवकांना पालिकेत बसण्यासाठी स्वतंत्र केबिन द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र प्रशासनाकडून ही मागणी नाकारण्यात आली.
दुसरीकडे उपनगराध्यक्षांची केबिन अद्ययावत केल्यानंतर, याच ठिकाणी भाजपच्या पक्षप्रतोदांसाठीदेखील स्वतंत्र केबिन तयार करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीला ठेंगा दाखवून भाजपच्या पक्षप्रतोदांसाठी स्वतंत्र केबिन दिल्यामुळे राष्ट्रवादीला हा निर्णय चांगलाच झोंबणारा ठरला आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. यानिमित्ताने पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांतील जिरवाजिरवीचे राजकारण चव्हाट्यावर आले आहे. याची सध्या चर्चा सुरु आहे.
ठिय्या आंदोलन करणार
याबाबत राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजित माळी म्हणाले की, पालिकेत राष्ट्रवादी विरोधक म्हणून प्रभावी काम करत आहे. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांसाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांची केबिन असतानादेखील पक्षप्रतोदांसाठी स्वतंत्र केबिन दिली आहे. मात्र आम्ही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसाठी स्वतंत्र केबिनची मागणी केल्यानंतर पालिकेकडून टाळाटाळ केली जात आहे. लवकरच केबिन मंजूर झाली नाही, तर येणाऱ्या काळात पालिकेच्या दारात ठिय्या मारुन आंदोलन करु.