BJP-Eknath Shinde: भाजप-एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत वादाची ठिणगी, सांगलीत संघर्षाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 04:45 PM2023-02-03T16:45:13+5:302023-02-03T16:48:01+5:30
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी केलेल्या दाव्यामुळे संघर्ष पेटला
सांगली : भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना राज्यातील सत्तास्थानी गुण्यागोविंदाने नांदताना दिसत असली तरी जिल्ह्यात या दोन्ही पक्षांमध्ये संघर्षाला सुरुवात झाली आहे. भाजपच्या नेत्यांकडून शिंदे यांच्या पक्षाला अदखलपात्र ठरविले जात असून आता विधानसभेच्या सर्व आठही जागांवर भाजपकडून दावा केल्याने शिंदे गटाचे आमदार व पदाधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.
सांगली जिल्ह्यात सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे खानापूर-आटपाडी ही विधानसभेची एकमेव जागा आहे. याठिकाणी आमदार अनिल बाबर यांचे वर्चस्व असले तरी याच मतदारसंघातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी दावा केल्यामुळे संघर्ष पेटला आहे. पुढील आमदारकीसाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून दावेदारी केली जात आहे.
शिंदे यांच्या शिवसेनेमार्फत इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ, पलूस-कडेगाव या मतदारसंघातील विधानसभा लढविण्याचीही तयारी केली जात आहे. युतीतील जागावाटपात यासाठी दावा केला जाऊ शकतो. अशा स्थितीत एकाही मतदारसंघासाठी भाजप तडजोड करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही.
भाजपचे नेते त्याबाबत आता जाहीर कार्यक्रमातून दावे करू लागले आहेत. दुसरीकडे शिंदे गटाने अद्याप यावर प्रतिक्रिया दिली नाही. आमदार अनिल बाबर यांनी मात्र त्यांच्या मतदारसंघातील दावेदारी कायम असल्याचे सांगत पडळकरांना टोला लगावला आहे. एकुणच आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पर्श्वभुमीवर राजकीय वातावरण सध्या तापु लागले आहे.
महापालिका क्षेत्रातील लोकांवर दोन्ही पक्षांतील नेत्यांचा डोळा
राष्ट्रवादी, काँग्रेसमधील नगरसेवक तसेच या दोन्ही पक्षांचे महापालिका क्षेत्रातील पदाधिकारी खेचण्यासाठी भाजप व शिंदे गटात संघर्ष सुरू आहे. दोन्ही पक्षांकडून एकाचवेळी ऑफर मिळत असल्यामुळे प्रवेश करणारेही गोंधळले आहेत.
आठही जागा आमच्याच
पालकमंत्री व भाजपचे नेते आ. सुरेश खाडे यांनी इस्लामपूर येथील कार्यक्रमात जिल्ह्यातील आठही मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून येतील, असा दावा केला. आठही जागांवर निवडणूक लढविण्याचे त्यांनी जाहीरही केले. त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.
विकासकामांमध्येही संघर्ष
एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी विविध कामांना हिरवा कंदील दर्शविला आहे. याच कामांचे श्रेय भाजपचे नेतेही घेताना दिसत आहेत. खानापूर आटपाडी मतदारसंघात हा संघर्ष अधिक दिसून येत आहे.