महापालिकेत भाजप-आयुक्तांमध्ये सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:18 AM2021-07-21T04:18:33+5:302021-07-21T04:18:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेतील सत्ता गमाविल्यानंतर प्रथम भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. सत्तेचा करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेतील सत्ता गमाविल्यानंतर प्रथम भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. सत्तेचा करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपने आता आयुक्त नितीन कापडणीस यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्याची प्रचिती महापालिकेच्या सभेत आली. कधीकाळी भाजपचे फेव्हरेट असलेल्या आयुक्तांचा कारभार आता मनमानी, निष्क्रिय वाटू लागला आहे.
महापालिकेत सत्तेत आल्यानंतर भाजपने विकासाची अनेक स्वप्ने जनतेला दाखविली होती. सत्तेचा मुकुट हाती येताच भाजपलाही शहराच्या विकासाची वाट काटेरी असल्याचे दिसून आले. त्यात तत्कालीन आयुक्त रवींद्र खेबूडकर हे नियमांवर बोट ठेवत असल्याने आधी त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न झाले. राज्यातही भाजपची सत्ता असल्याने मर्जीतील आयुक्त आणता येईल, असे आखाडेही बांधले गेले. नागपूर महापालिकेत उपायुक्त असलेल्या नितीन कापडणीस यांना स्थानिक नेत्यांनी गळ घालून सांगलीत आयुक्त म्हणून आणले. दीड वर्षापर्यंत सारे काही सुरळीत सुरू होते. पण चार महिन्यापूर्वी पक्षातील सुंदोपसुंदीने भाजपला सत्ता गमवावी लागली. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री जयंत पाटील व त्यांच्या सहकार्याने भाजपचा करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर प्रशासनाची चाल बदलली. वारणाली रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न असो की घनकचरा प्रकल्प असो, प्रत्येकवेळी प्रशासनाने पूर्वीच्या भूमिकेत बदल केला. घनकचरा प्रकल्पाची निविदा रद्दसाठी भाजपच्या नेत्यांनी जोर लावला. तरीही आयुक्तांनी हा ठराव विखंडित करण्यासाठी पाठविला. वाघमोडेनगरऐवजी वारणालीत मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचा अहवाल शासनाकडे पाठविला. कुपवाड ड्रेनेजसारख्या मोठ्या प्रकल्पाचे श्रेयही आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदरात जात आहे. त्यातून अनेकजण दुखावले गेले. त्यात सत्ता गेल्याचे शल्य होतेच.
महापौर निवडीतील पराभवानंतर भाजपचे नगरसेवक तसे शांतच होते. पण काही दिवसांपूर्वी नेत्यांनी बैठक घेत नगरसेवकांना आक्रमक होण्याचा सल्ला दिला. हा सल्ला शिरसावंद्य मानून भाजपने आक्रमण सुरू केले आहे. त्यात ॲपेक्स रुग्णालयाचे प्रकरण भाजपच्या हाती लागले. हा विषय महापालिकेच्या बाहेर भाजपने तापवित ठेवला. आता महासभेच्या पटलावरही आणला. सभेतही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभारापेक्षा आयुक्तांवर टीकेचे बाण सोडण्यात आले. त्यामुळे भविष्यात महापालिकेत आयुक्त विरुद्ध भाजप असाच सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
चौकट
काहींचे मौन, तर मोजकेच आक्रमक
आयुक्तांशी जवळीक असलेल्या भाजपसह सर्वच पक्षातील नगरसेवकांनी मौन पाळले आहे तर धीरज सूर्यवंशी, गजानन मगदूम, विनायक सिंहासने असे मोजकेच नगरसेवक आक्रमक आहेत. मनमानी, निष्क्रियतेची टीका करणाऱ्या भाजपने कोरोनाच्या पहिल्या लाटेत केलेल्या कार्याबद्दल आयुक्तांचे कौतुकही केले होते. आता मात्र भाजपने संघर्षाचा पवित्रा घेतला आहे.