भाजपमुळे काँग्रेस, राष्ट्रवादीची लागणार कसोटी
By Admin | Published: January 11, 2017 11:40 PM2017-01-11T23:40:43+5:302017-01-11T23:40:43+5:30
सांगलीत हालचालींना वेग : शिराळा, खानापूर, आटपाडीत दोन्ही काँग्रेस एकत्र
सांगली : जिल्हा परिषदेच्या ६० गट आणि पंचायत समितीच्या १२० गणांसाठी बुधवारपासून आचारसंहिता लागली आहे. दि. २१ फेब्रुवारीला मतदान होणार असल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची उमेदवार निश्चितीसाठी धडपड चालू आहे. भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण शक्तीने निवडणूक मैदानात उतरल्यामुळे दोन्ही काँग्रेसची कसोटी लागणार आहे. दरम्यान, नेत्यांचे आदेश डावलून शिराळा, खानापूर, आटपाडी येथे राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडी केली आहे.
जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळे सर्व पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. काँग्रेसचे नेते आमदार डॉ. पतंगराव कदम, जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, जयश्रीताई पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी जिल्हाभर दौरे करून मतदारांशी संपर्क साधला आहे. उमेदवारी निश्चितीसाठी त्यांनी इच्छुकांशी चर्चाही केली आहे. बुधवारी जयश्रीताई पाटील आणि विशाल पाटील यांनी मिरज तालुक्यातील इच्छुकांच्या सांगलीत बैठका घेऊन निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.
राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील सध्या एकहाती किल्ला लढवित आहेत. त्यांना जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, माजी आम. मानसिंगराव नाईक, माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख, आ. सुमनताई पाटील, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांचे सहकार्य लाभत आहे; परंतु राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते भाजप व शिवसेनेत गेल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नेत्यांची मोठी पोकळी निर्माण झाल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीची सत्ता टिकविण्याचेही जयंत पाटील यांच्यासमोर फार मोठे आव्हान आहे.
भाजप प्रथमच पूर्ण शक्तिनिशी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींच्या मैदानात उतरला आहे. खासदार संजयकाका पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आ. शिवाजीराव नाईक, आ. विलासराव जगताप, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर या नेत्यांनी जिल्हा परिषदेत ‘कमळ’ फुलविण्याचा निश्चय केला आहे. त्यांना महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांची भक्कम साथ मिळताना दिसत आहे.
खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर हे शिवसेनेचे असल्यामुळे दोन तालुक्यांत शिवसेनेची निश्चितच ताकद वाढली आहे. येथील निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशीच होणार आहेत. वाळवा तालुक्यातील चिकुर्डे जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे अभिजित पाटील लक्षवेधी लढत देण्याची शक्यता आहे. कवठेमहांकाळ, मिरज, जत येथेही शिवसेना, मनसे या पक्षांनी निवडणुकीची तयारी चालू केली आहे.
मिरज, वाळवा, पलूस, शिराळा, तासगाव या तालुक्यांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाच्या माध्यमातून जनतेशी चांगला संपर्क आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे संघटनेचे मंत्री असल्यामुळे काही ठिकाणी त्यांना यश मिळणार आहे.
आजवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशाच झाल्या आहेत. प्रथमच भाजप, शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण शक्तीने निवडणूक रिंगणात उतरली आहे. त्यामुळे निवडणुकांचे तिरंगी चित्र निर्माण झाले आहे. सध्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे ३३, काँग्रेसकडे २३, विकास आघाडी तीन, जनसुराज्य शक्ती एक आणि अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल आहे. जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात असून, ती सत्ता टिकविणे जयंत पाटील यांच्यासमोर फार मोठे आव्हान आहे. काँग्रेसचे नेते जिल्हा परिषदेवर झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पण, भाजप, शिवसेनेचा त्यांच्यासमोर मोठा अडथळा आहे.