भाजप, कॉँग्रेस, राष्ट्रवादीत लढत
By Admin | Published: October 1, 2014 10:19 PM2014-10-01T22:19:03+5:302014-10-02T00:19:10+5:30
जत मतदारसंघ : अकराजण रिंगणात; खांदेपालटानंतर चुरशीचा सामना
जयवंत आदाटे - जत विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात अकरा उमेदवार आहेत. त्यामध्ये सात राजकीय पक्षांचे उमेदवार व चार अपक्षांचा समावेश आहे. या अकरामध्ये एकमेव महिला उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहे. अकरा उमेदवार असले तरी, येथील निवडणूक भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येच होणार आहे.
आमदार प्रकाश शेंडगे २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. यावेळी ते राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत. मागील पाच वर्षात त्यांचा जनसंपर्क कमी होता. त्यामुळे भाजपमध्येच त्यांच्याबद्दल नाराजी होती. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यावेळी त्यांचे समर्थन केलेले कार्यकर्ते आता त्यांच्याविरोधात आहेत. या विरोधकांना थोपवून राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निवडणूक प्रचार यंत्रणा राबविताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. धनगर समाज आणि मागासवर्गीय समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी आमदार शेंडगे यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये त्यांना कितपत यश येईल, हे १९ रोजीच स्पष्ट होईल.
मागील निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढणारे विलासराव जगताप यावेळी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. भाजपचे विद्यमान आमदार प्रकाश शेंडगे यांना डावलून पक्षाची उमेदवारी मिळविण्यात जगताप यांनी बाजी मारली आहे. यामुळे त्यांनी आधीच निम्मी बाजी मारली आहे, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. राष्ट्रवादीमध्ये असूनही लोकसभा निवडणुकीत भाजपच्या संजयकाका पाटील यांना जगताप यांनी मदत केली होती. त्यामुळे आता त्यांच्या पाठीशी खासदार पाटील संपूर्ण ताकद लावणार, हे स्पष्ट आहे. एकेकाळी जगताप यांचे समर्थक मानले गेलेले आणि काही कारणांमुळे नाराज होऊन दूर गेलेले प्रभाकर जाधव व प्रकाश जमदाडे यांना आपलेसे करून त्यांनी बेरजेचे राजकारण केले आहे. याचा त्यांना निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे.
भारती बँकेचे संचालक व माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे नातेवाईक विक्रम सावंत काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. जत मतदारसंघात १४ ते १६ हजार इतका तरुण मतदार आहे. फेसबुक आणि व्हॉटस् अॅप या सोशल मीडियाचा वापर करून नवतरुण मतदारांना त्यांनी आकर्षित केले आहे. याचा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षातील वसंतदादा गटाचे प्रमुख सुरेश शिंदे यांनी त्यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली होती. मात्र शिंदे यांचे बंड शमवण्याची जबाबदारी डॉ. कदम यांनी मदन पाटील यांच्यावर टाकली होती. शिंदे यांनी बंड मागे घेतले असले तरी पक्षांतर्गत नाराजांची मर्जी सांभाळून वसंतदादा गटाला शह देताना विक्रम सावंत यांची दमछाक होणार आहे.
जत विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणात अकरा उमेदवार असले तरी, प्रकाश शेंडगे, विलासराव जगताप आणि विक्रम सावंत हे तिघेच तुल्यबळ उमेदवार आहेत. त्यामुळे येथील निवडणूक तिरंगी होणार आहे. प्रचारयंत्रणा यशस्वीपणे राबवून मतदारांना भेटून त्यांचे रूपांतर मतदानात करून घेण्यात जो उमेदवार यशस्वी होईल, त्याला यश मिळण्याची शक्यता आहे. ऐनवेळी केलेले पक्षांतर, तालुका विभाजन, म्हैसाळ योजनेचे पाणी, जत येथे होणारे कृषी महाविद्यालय, खराब रस्ते आदी प्रमुख प्रश्न प्रचारातील मुद्दे राहणार आहेत.
नावपक्ष
प्रकाश शेंडगे राष्ट्रवादी
विलासराव जगताप भाजप
विक्रम सावंत काँग्रेस
भाऊसाहेब कोळेकर मनसे
संगाप्पा तेली शिवसेना
जकाप्पा सर्जे बसपा
बबन शिंगाडेशेकाप
दिनकर पतंगे अपक्ष
रवींद्र सोनार अपक्ष
सखुबाई खांडेकर अपक्ष
सुनील दलवाई अपक्ष