भाजप-कॉँग्रेस समर्थकांत निगडी बुद्रुकला मारामारी
By admin | Published: February 21, 2017 11:44 PM2017-02-21T23:44:59+5:302017-02-21T23:44:59+5:30
सरपंचांसह चार जखमी : माडग्याळ, सनमडीत बाचाबाची
जत : तालुक्यातील निगडी बुद्रुक (लमाणतांडा) येथे निवडणूक वादातून भाजप व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दगड आणि काठीने मारामारी झाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचारच्यादरम्यान घडली. या मारामारीत सरपंच संजय चौके यांच्यासह विष्णू निळे, अरविंद निळे, गणपती पाटील असे चारजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत उमदी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. निगडी बुद्रुक, लमाणतांडा व कारंडे वस्ती येथील मतदान केंद्रे निगडी बुद्रुक येथे एकाच ठिकाणी आहेत. सायंकाळी साडेचार वाजण्याच्यादरम्यान पूर्वीच्या राजकीय वादातून निगडी बुद्रुक मतदान केंद्रासमोर कारंडे वस्ती येथील नागरिकांत प्रथम बाचाबाची व त्यानंतर मारामारी झाली. यानंतर जखमी सरपंच संजय चौके यांना येथील नागरिकांनी एका खोलीत कोंडून ठेवले होते. याची माहिती जत विभाग पोलिस उपअधीक्षक नागनाथ वाकुडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन चौके यांची सुटका करून जखमींना रुग्णालयात पाठविले. त्यानंतर येथील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सनमडी येथे विकास आघाडी व भाजप कार्यकर्ते, बनाळी येथे भाजप व कॉँग्रेस कार्यकर्ते, उमदी खालील कोडग वस्ती येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस कार्यकर्ते, सोन्याळ येथे भाजप व कॉँग्रेस कार्यकर्ते यांच्यात मतदान केंद्रासमोर किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमक, बाचाबाची आणि मारामारी झाली. यामध्ये कोणीही जखमी झाले नसून, पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नाही. (वार्ताहर)