विरोधी पक्षनेता पदासाठी भाजप दावेदार!
By admin | Published: March 7, 2017 10:27 PM2017-03-07T22:27:39+5:302017-03-07T22:27:39+5:30
जिल्हा परिषद : राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच काँगे्रसने हे पदही हरपण्याची शक्यता
सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात काँगे्रस पहिल्यांदाच सात इतक्या कमी निच्चांकी सदस्य संख्येवर घसरली. तर गत निवडणुकीत अवघा एक सदस्य निवडून आलेल्या भाजपने मुसंडी मारली आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणात भाजपने शिवसेनेला सोबत घेऊन विरोधी पक्षनेतेपद मिळविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राज्य पातळीवरून काँगे्रस व राष्ट्रवादी या दोन पक्षांनी एकत्रित राहण्याच्या सूचना होत असल्याने जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी व काँगे्रस हे दोन पक्ष एकत्र राहण्याची शक्यता जास्त आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची बहुमताची सत्ता असली तरी काँगे्रसही राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात हात घालून काम करण्याच्या तयारीला लागल्याचे सध्याच्या राजकीय हालचालींवरून समोर येत आहे.या परिस्थितीत विरोधी पक्षनेतेपद भाजपलाच मिळणार, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. भाजपनेही त्यासाठी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. भाजप, शिवसेना व सातारा विकास आघाडी हे तीन पक्ष एकत्रितपणे प्रबळ विरोधकाची भूमिका निभावणार आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने वर्णे, वनवासवाडी, कुकुडवाड, कुडाळ, सैदापूर, कार्वे, रेठरे बुद्रुक या गटांवर कब्जा मिळविला आहे. शिवसेनेला तळदेव, मारुल हवेली, काळगाव व मल्हारपेठ या गटांवर ताबा मिळवला आहे. सातारा विकास आघाडीने कोडोली, शाहूपुरी, नागठाणे या गटांत आपले उमेदवार निवडून आणले आहेत. या सर्वांची बेरीज केली तर ती ११ इतकी होत आहे. ही संख्या काँगे्रसच्या सदस्य संख्येपेक्षा ४ ने जास्त आहे. साहजिकच, काँगे्रसने विरोधी पक्षनेतेपदही गमावले आहे. या पदावर भाजपच दावा करत आहे. याउलट काँगे्रसचे नेतेमंडळी मात्र पराभव जिव्हारी लागल्याने पुरतेच चिंतेत आहेत.
जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जिल्हावासीयांनी राष्ट्रवादीच्या पारड्यात सत्ता टाकली. ६४ गटांपैकी तब्बल ३९ गट राष्ट्रवादीच्या ताब्यात आले. शिरवळ गटातील उदय कबुले या अपक्ष सदस्यांनी देखील राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केल्याने राष्ट्रवादीची जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या ही ४० इतकी झाली आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीला बहुमतासाठी इतरांची मदत घ्यावी लागत होती. यावेळी मात्र राष्ट्रवादीचे पूर्ण बहुमत आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना आमच्यासोबत राहील. शिवसेनेचे चार व आमचे सात सदस्य एकत्रित काम करतील. सातारा तालुक्यात सातारा विकास आघाडीसोबत आम्ही काही जागांवर निवडणूक लढविली. त्यांचेही तीन सदस्य निवडून आले आहेत. सातारा विकास आघाडीही आमच्यासोबत राहील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमचे सदस्य प्रबळ विरोधकाची भूमिका बजावतील.
- विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष, भाजप
जातीयवादी पक्षांविरोधात दोन्ही काँगे्रस एकत्रितपणे काम करतील. कऱ्हाड दक्षिणमध्ये जातीयवादी पक्षांना थोपविण्यासाठी पृथ्वीराजबाबांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. ऐन निवडणुकीत उंदीर काँगे्रसच्या जहाजातून बाहेर पडले आहेत.
- आनंदराव पाटील, जिल्हाध्यक्ष, काँगे्रस