महापालिका सभेत घुसून भाजप नगरसेवकांचा महापौरांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:27 AM2021-03-27T04:27:05+5:302021-03-27T04:27:05+5:30
महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन घ्यावी, या मागणीसाठी शुक्रवारी भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात घुसून महापौरांना घेराव घातला. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली ...
महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन घ्यावी, या मागणीसाठी शुक्रवारी भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात घुसून महापौरांना घेराव घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन घ्यावी, या मागणीसाठी शुक्रवारी भाजप नगरसेवक आक्रमक झाले. ऑनलाईन सभा सुरू असतानाच त्यांनी सभागृहात घुसून महापौरांना घेराव घातला, तर महिला नगरसेवकांनी प्रवेशद्वारावरच ठिय्या मारला होता. या गोंधळातच महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सभा आटोपती घेतली.
महापालिकेतील सत्तांतरानंतर पहिलीच सभा महापौर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत गुंठेवारी समितीची स्थापना, प्रभाग समित्यांची पुनर्रचना असे विषय चर्चेला होते. या दोन्ही विषयांना भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केला. दरम्यान, ऑनलाईन सभेत रेंज नसल्याने अडथळे येत आहेत, असे सांगत सभागृह नेते विनायक सिंहासने, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासह काही नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर जमले व महापौरांना घेराव घातला. लिंक का पाठवली नाही, नगरसेवकांचे बोलणे ऐकू येत नाही, अशा तक्रारी करत सभा उधळण्याचा प्रयत्न केला. प्रवेशद्वारावर ठिय्या मारून बसलेल्या महिला नगरसेविकाही सभागृहात आल्या. ऑनलाईन सभा प्रलंबित ठेवून ऑफलाईन घ्यावी, अशी मागणी करत भाजपच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी सुरू केली. आघाडी सरकारच्या धिक्काराच्या घोषणाही देण्यात आल्या. अखेर महापौरांनी अजेंड्यावरील विषय मंजूर करत सभा आटोपती घेतली. त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी, महापौरांनी पळ काढल्याचा आरोप केला.
चौकट
घोडेबाजारासाठी ऑनलाईन सभा : विनायक सिंहासने
अनेक नगरसेवकांना ऑनलाईन सभेची लिंक पाठवली नाही. महिला सदस्यांनाही बोलण्याची संधी दिली नाही. त्यामुळे आम्ही सभागृहात जाऊन तक्रार केली. काँग्रेस-राष्ट्रवादीला ऑनलाईन सभेतून भ्रष्टाचार करायचा आहे. ज्या सोनेरी टोळीने मदन पाटील यांना बदनाम केले, ती टोळी पुन्हा शिरली आहे. घोडेबाजार करून आघाडीने महापालिकेची लूट करण्यासाठीच सत्ता मिळविली आहे. त्यासाठीच ऑफलाईन सभा घेतली जात नसल्याचा आरोप विनायक सिंहासने, धीरज सूर्यवंशी, स्वाती शिंदे यांनी केला.
चौकट
भाजप सत्ताकाळात गप्प का? : दिग्विजय सूर्यवंशी
महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले की, भाजपची सत्ता असताना वर्षभर ऑनलाईन सभा झाल्या. त्यावेळी ऑफलाईन सभेसाठी भाजपने आग्रह का धरला नाही? सत्ता गेल्यानंतरच त्यांना ऑफलाईन सभेची आठवण झाली आहे. कोरोनामुळे शासनाने ऑनलाईन सभा घेण्याचे निर्देश दिले आहेत. परवानगी मिळाल्यास ऑफलाईन सभाही घेऊ.
चौकट
कायदेशीर कारवाईचा विचार
शासन आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून ऑफलाईन सभेसाठी भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातला. याबाबत प्रशासनाकडून अहवाल घेऊन कायदेशीर कारवाईचा विचार असल्याचे महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले.