भाजपचे नगरसेवक म्हणतात, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:30 AM2021-03-09T04:30:24+5:302021-03-09T04:30:24+5:30

सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीवेळी भाजपला धक्का देणाऱ्या फुटीर सहा नगरसेवकांनी आता यू-टर्न घेतला आहे. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदानच ...

BJP corporators say, we did not vote for Congress-NCP | भाजपचे नगरसेवक म्हणतात, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केलेच नाही

भाजपचे नगरसेवक म्हणतात, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केलेच नाही

Next

सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीवेळी भाजपला धक्का देणाऱ्या फुटीर सहा नगरसेवकांनी आता यू-टर्न घेतला आहे. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदानच केले नाही. आम्ही भाजपसोबतच आहोत, मतदान झाले असेल तर तो तांत्रिक दोष आहे, असा खुलासा केला आहे, तर काहींनी कोरोनाचे कारण देत रुग्णालयात उपचार घेत असल्याचे म्हणणे मांडले आहे. या नगरसेवकांनी पोस्टाद्वारे नोटिशीला उत्तर दिले असून ते मंगळवारपर्यंत भाजप श्रेष्ठींना प्राप्त होईल.

महापालिकेत भाजपचे बहुमत असतानाही महापौर व उपमहापौर निवडीत काँग्रेस-राष्ट्रवादीने धक्का दिला होता. सात फुटीर नगरसेवकांमुळे महापौर व उपमहापौरपद भाजपला गमावावे लागले. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हैसाळकर यांनी फुटीर नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार या फुटीर नगरसेवकांना पक्षाचा व्हीप डावलल्याबद्दल नोटीसही बजाविण्यात आली होती. त्यांना आठ दिवसांत म्हणणे मांडण्याची मुदत दिली होती. या मुदतीत फुटीर नगरसेवकांनी उत्तर पोस्टाद्वारे पाठविले आहे.

शिवाजी दुर्वे व आनंदा देवमाने यांनी कोरोनाचे कारण दिले आहे. आम्ही पक्षासोबतच आहोत; पण कोरोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने रुग्णालयात उपचार घेत होतो. तिथे आमच्याकडे मोबाइल नव्हता. पक्षाने अपक्ष नगरसेवकाला उपमहापौरपदाची उमेदवारी दिली होती. त्यामुळे भाजपचा व्हीप बेकायदेशीर आहे. तसेच उमेदवार निवडण्यासाठी पक्षाची बैठक झालेली नव्हती. त्यात आमच्या घरच्या पत्त्यावर व्हीप बजाविला होता. आम्ही दवाखान्यात असल्याने व्हीपच मिळालेला नाही, असा पवित्रा घेतला आहे.

नगरसेविका नसीमा नाईक यांनी दिग्विजय सूर्यवंशी, उमेश पाटील यांना मी मतदान केले नाही. त्यांना मतदान झाले असेल तर तो तांत्रिक दोष आहे. त्यात माझा दोष नाही, असा खुलासा केला आहे. तसेच ऑनलाइन मतदानाबाबतची तांत्रिक माहिती, ज्ञान प्रशासनाकडून दिले नाही. पक्षानेही माहिती दिलेली नसल्याचे म्हटले आहे. नगरसेवक महेंद्र सावंत म्हणाले, भाजपने बजावलेल्या नोटीसवर वकिलांमार्फत खुलासा तयार केलेला आहे. तो पक्षाकडे पाठविला आहे. त्यामुळे आता भाजपकडून काय कारवाई केली जाते, याची उत्सुकता लागली आहे.

चौकट

कायदेशीर कारवाईवर ठाम -शिंदे

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हणाले, फुटीर सहा नगरसेवकांना नोटिसा पाठविल्याची पोहोच आलेली आहे. खुलाशांची वाट पाहून त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू होईल. कारवाईसाठी पुणे विभागीय आयुक्तांकडे अर्ज सादर होईल. भाजपच्या नगरसेवकांवर शंभर टक्के अपात्रतेची कारवाई होईल, असे सांगितले.

Web Title: BJP corporators say, we did not vote for Congress-NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.