इस्लामपूर पालिकेसाठी भाजप द्विधावस्थेत
By admin | Published: October 4, 2016 12:10 AM2016-10-04T00:10:36+5:302016-10-04T01:02:04+5:30
निवडणुकीचे वेध : विकास आघाडीची बिघाडी करण्याचे मनसुबे, मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे भाजपचे कार्यकर्ते रिचार्ज
अशोक पाटील -- इस्लामपूर महाआघाडीतील नेते खासदार राजू शेट्टी यांनी वाळवा-शिराळ्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात भाजप, शिवसेना, वेळ पडल्यास काँग्रेससह इतर घटकपक्षांची मोट बांधण्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे भाजप युवा मोर्चाचे विक्रम पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी यांनी, इस्लामपूर पालिका निवडणुकीसाठी शेट्टी यांच्या धोरणाबाबत संभ्रम निर्माण केला आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात विकास आघाडीची बिघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिल्यापासून भाजप कार्यकर्त्यांत ऊर्जा निर्माण झाली आहे. ही ऊर्जा पालिका निवडणुकीपर्यंत कायम ठेवण्यासाठी विक्रम पाटील यांनी पक्षाच्यावतीने अभियान राबविले. त्याचा समारोप इस्लामपुरातील गांधी चौकात सभेने करण्यात आला. या अभियानाला माजी आमदार भगवानराव साळुंखे, ज्येष्ठ नेते बाबासाहेब सूर्यवंशी यांनी पाठिंबा दिला. परंतु पालिकेतीलच भाजपचे विरोधी पक्षनेते, जिल्ह्याचे उपाध्यक्ष विजय कुंभार यांनीच अभियानाकडे पाठ फिरवली होती.
आगामी पालिका निवडणुकीत फक्त भाजपच्या नेतृत्वाखाली येईल त्यांनाच घेऊन निवडणुकीत उतरू, असा ठाम विश्वास व्यक्त करुन विक्रम पाटील यांनी, खासदार राजू शेट्टी यांच्या राष्ट्रवादीविरोधकांची मोट बांधण्याच्या प्रयत्नांना तडा दिला आहे. तसेच बाबासाहेब सूर्यवंशी यांनी, आगामी पालिका निवडणुकीत शहर सुधार समिती आणि विकास आघाडीची परंपरा कायम ठेवण्याची आशा व्यक्त केली आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या धोरणाविषयी भाजपमध्ये आजही मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणुकीतच : एकीचे दर्शन
गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. राष्ट्रवादीविरोधात शहर सुधार समिती, विकास आघाडी अशा आघाड्या झाल्या. प्रत्येक निवडणुकीत विकास आराखडा, निकृष्ट रस्ते, झालेला भ्रष्टाचार यावरच सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली. परंतु फक्त निवडणुकीपुरतेच विरोधक एकत्र येत असल्याने, मतदार त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत.
विक्रमभाऊंचे स्वप्न
राज्यातील युती सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी वाटेगाव (ता. वाळवा) येथे जनता कारखाना उभारण्याचे स्वप्न अशोकदादा पाटील यांना दाखविण्यात आले होते. परंतु पुढे त्या कारखान्याबाबत त्याचे काहीही झाले नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विक्रम पाटील यांना साखर कारखान्याचे पुन्हा स्वप्न दाखविण्यात आले आहे. यातून तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, अशी ग्वाही विक्रम पाटील यांनी दिली आहे.
सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकांमध्ये वापरला जातो ‘सबसे बडा रुपया’
आतापर्यंतच्या पालिकेच्या सहा निवडणुकांमध्ये सर्व विरोधकांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत भाषणबाजीवेळी नागरिकांचा विरोधकांच्या सभांना मोठा प्रतिसाद दिसतो. परंतु शेवटच्या टप्प्यात सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ‘अर्थ’पूर्ण हालचाली होतात. विरोधकांच्या सभांना दिसणारी गर्दी मतांमध्ये रूपांतरीत होत नाही.