सांगली महापालिकेच्या सभापती निवडीवर भाजपचे वर्चस्व, फुटीर नगरसेवकांची घरवापसी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 12:26 PM2022-10-22T12:26:48+5:302022-10-22T12:28:20+5:30
भाजपच्या फुटीर नगरसेवकांनी घरवापसी केल्याने सभापती निवडीत भाजपचा मार्ग सुकर झाला.
सांगली : महापालिकेच्या समाज कल्याण व महिला बालकल्याण समिती सभापतीपदी अनुक्रमे भाजपच्या अनिता वनखंडे व अस्मिता सलगर यांची निवड झाली. काँग्रेसच्या कांचन कांबळे यांनी माघार घेतल्याने वनखंडे यांची बिनविरोध निवड झाली. तर सलगर यांनी आघाडीच्या आरती वळवडे यांचा ९ विरुद्ध ७ मतांनी पराभव केला. भाजपच्या फुटीर नगरसेवकांनी घरवापसी केल्याने सभापती निवडीत भाजपचा मार्ग सुकर झाला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. महिला व बालकल्याण समितीमध्ये भाजप ९, काँग्रेस ४, तर राष्ट्रवादीचे ३ सदस्य आहेत. सभापती पदासाठी भाजपच्या अस्मिता सलगर व आघाडीच्या आरती वळवडे यांच्यामध्ये लढत झाली. फुटीर नगरसेविका नसीमा नाईक या भाजपच्या गोटात सहभागी झाल्या. सलगर यांना ९, तर वळवडे यांना ७ मते मिळाली.
समाज कल्याण समितीमध्ये भाजप ७, राष्ट्रवादी ३, तर काँग्रेसच्या १ सदस्यांचा समावेश आहे. सभापती पदासाठी भाजपकडून अनिता वनखंडे व आघाडीच्या कांचन कांबळे यांनी अर्ज दाखल केले होते. राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्याने कांबळे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला. त्यामुळे वनखंडे बिनविरोध निवडून आल्या. त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी केली.
निवडीनंतर आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, शेखर इनामदार, गटनेत्या भारती दिगडे, स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी यांनी नूतन सभापतींचा सत्कार केला.
शहराच्या विकासावर भर : इनामदार
शेखर इनामदार म्हणाले, दोन्ही सभापती कामातून पदांना न्याय देतील. भाजप एकसंघ असल्याने विजयाने सिद्ध झाले. महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणणार आहोत. मिरज येथील काळीखण सुशोभीकरण, कुपवाड ड्रेनेज, ५० कोटींचा निधी, सुसज्ज नाट्यगृहासह विविध विकासकामांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. येत्या आठ महिन्यांत महापालिकेच्या विकासाचा बॅकलाॅग भरून काढू, अशी ग्वाही दिली.