सांगली: मिरजेत राष्ट्रवादीला शह देण्याची भाजपची रणनीती, आगामी निवडणुकीसाठी तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 01:06 PM2022-11-04T13:06:50+5:302022-11-04T13:12:05+5:30
भाजप नेत्यांनी मिरज पश्चिम भागातील गावोगावच्या वजनदार नेत्यांना भाजपमध्ये प्रवेशासाठी जाळे टाकले
कसबे डिग्रज : आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. विविध प्रकारची सत्ता केंद्रे ताब्यात असणाऱ्या भाजपला इस्लामपूर मतदारसंघात ताकद वाढवायची आहे. यासाठी भाजप नेत्यांनी मिरज पश्चिम भागातील गावोगावच्या वजनदार नेत्यांना भाजपमध्ये प्रवेशासाठी जाळे टाकले आहे. यातून विरोधकांना प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत तीन वेळा वरिष्ठ नेत्यांच्या बैठका झाल्या आहेत.
मिरज पश्चिम भागातील आठ गावे इस्लामपूर मतदारसंघाला जोडली गेली आहेत. काम करणाऱ्या नेत्यांच्या पाठिशी हा भाग ठामपणे उभा राहतो. म्हणूनच सांगली मतदारसंघात विविध नेते आणि पक्ष यांना संधी मिळाली. तीच परिस्थिती सध्याही कायम आहे.
गेल्या तीन विधानसभेला आमदार जयंत पाटील यांना या भागाने साथ दिली. कार्यकर्त्यांच्या गटागटाची जयंत पाटील यांनाही माहिती आहे आणि गट - तट कितीही असूदेत म्हणत त्यांनीही त्यास खतपाणी दिले. यातूनच काहीजण नाराज आहेत. हीच नाराजी राष्ट्रवादीच्या विविध कार्यक्रमात उफाळून येते आहे.
अशाच नाराज नेत्यांना हेरण्याचे काम भाजपने चालविले आहे. कसबे डिग्रज, कवठेपिरान, तुंग, दुधगाव या गावातील प्रमुखासाठी राहुल महाडिक आणि सांगलीतील शेखर इमानदार यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
प्रमुख लोकांची बैठक मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार दिनकर पाटील यांच्या सोबत झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य आणि कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याची तयारी आहे. निर्णय गावोगावीच्या नेत्यांनी घ्यावा, असे आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे आगामी काळात कोण कोण भाजपमध्ये प्रवेश करतात आणि भाजप किती जणांना धक्के देतोय, हे दिसून येईल.