भाजप प्रदेश कार्यकारिणीची सांगलीतील बैठक रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 11:43 PM2018-06-01T23:43:27+5:302018-06-01T23:43:27+5:30
सांगली : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची येत्या ४ व ५ जून रोजी सांगलीत होणारी बैठक कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रद्द करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. आता ही बैठक जूनच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याचे खासदार संजय पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी आमदार सुरेश खाडे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष गोपीचंद पडळकर, राजाराम गरुड, विक्रम पाटील उपस्थित होते.
खा. पाटील म्हणाले की, महापालिका निवडणुकीपूर्वी सांगलीत राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संसदीय कामकाजमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह राज्यातील भाजपचे मंत्री, आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार होते. ४ जूनला स्टेशन चौकात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेचेही आयोजन करण्यात आले होते. या सभेत अनेकजण पक्षप्रवेश करणार होते. गेल्या आठ दिवसांपासून आम्ही तयारी सुरू केली होती. पण, गुरुवारी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने भाजपची मोठी हानी झाली आहे. ते जनता पक्ष, जनसंघापासून पक्षाचे सक्रिय पदाधिकारी होते. शिवाय माजी प्रदेशाध्यक्षही होते. त्यांच्या जाण्याने ही कार्यकारिणी बैठक रद्द करण्याचा निर्णय प्रदेश पातळीवर घेण्यात आला आहे. तसे शुक्रवारी सकाळी कळविण्यात आले आहे. त्यामुळे आता हे सर्व कार्यक्रम आणि सभा रद्द करण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी जूनच्या तिसºया आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी ही बैठक आणि त्यानिमित्ताने भाजपचे शक्तिप्रदर्शन व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या १५ व १६ जूनच्या दरम्यान राज्य कार्यकारिणी बैठक घेण्यासाठी आम्ही आग्रही राहणार असल्याचे पाटील म्हणाले.
पक्षप्रवेशाचा स्वतंत्र कार्यक्रम घेणार : पाटील
महापालिका निवडणुका आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, पृथ्वीराज देशमुख यांच्यासह आम्ही सर्वजण एकदिलाने लढणार असून महापालिकेवर भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त करीत खा. पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगलीत अन्य पक्षांतून आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार होते. पण आता बैठक व सभाच रद्द झाल्याने प्रवेश लांबला आहे. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीची प्रतीक्षा न करता स्वतंत्र पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कार्यकारिणी बैठकीपूर्वीच हा पक्षप्रवेश सोहळा होईल, असेही त्यांनी सांगितले.