भाजप सर्वच आघाड्यांवर अपयशी
By Admin | Published: November 4, 2015 11:23 PM2015-11-04T23:23:26+5:302015-11-04T23:58:25+5:30
सुमनताई पाटील : कवठेमहांकाळ तहसील कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा
कवठेमहांकाळ : दुष्काळग्रस्त जनतेच्या व्यथा शासनदरबारी मांडण्यासाठी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुमनताई पाटील तसेच विजय सगरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयावर राष्ट्रवादीच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार सचिन डोंगरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सकाळी साडेअकराला मल्लिकार्जुन देवालयाजवळ पावणेबारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. भाजप सरकारविरोधात थाळीनाद करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हा मोर्चा युववाणी चौक, शिवाजी चैक, हरि मंदिर या मार्गावरून तहसी कार्यालयाकडे वळला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी आ. सुमनताई पाटील म्हणाल्या की, भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर कामे करण्यात अपयशी ठरले आहे. भाजप सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. राज्यात महागाई वाढली आहे, सिंचन योजना बंद पडल्या आहेत, शेतकरी कर्जबाजारी होत आहेत, जनावरांचे चाऱ्याविना हाल सुरू आहेत.
विजय सगरे म्हणाले की, भाजप सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार आहे. भाजपच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. सरकारने डिझेल, पेट्रोलवरचा अधिभार कमी करावा, सिंचन योजनांसाठी निधी द्यावा.
राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष नामदेव करगणे म्हणाले की, भाजप सरकार जातीयवादी लोकांचे सरकार आहे. ते भांडवलदारांना पोसत आहे. अशा सरकारला राष्ट्रवादी धडा शिकविल्यशिवाय स्वस्थ बसणार नाही.
यावेळी टी. व्ही. पाटील, गणेश पाटील, सुरेखा कोळेकर आदींची भाषणे झाली. या मोर्चासाठी उपसभापती जगन्नाथ कोळेकर, गणपती सगरे, सुरेश पाटील, नारायण पवार, जालिंदर देसाई, सुहास पाटील, कल्पना घागरे, चंद्रकांत सगरे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)