शिराळा तालुक्यात भाजपला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:19 AM2021-07-21T04:19:09+5:302021-07-21T04:19:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोकरुड : शिराळा तालुक्यात आमदार मानसिंगराव नाईक, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांचा सततचा जनसंपर्क आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : शिराळा तालुक्यात आमदार मानसिंगराव नाईक, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांचा सततचा जनसंपर्क आणि मतदारसंघातील विकासकामे, तर दुसरीकडे माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख यांचा कमी होत असलेला संपर्क यामुळे तालुक्यात भाजपमध्ये दिवसेंदिवस गळती सुरू आहे. अनेक गावातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादीत जात आहेत. यामुळे भाजपच्या दोन्ही प्रमुख नेत्यांसमाेर डोकेदुखी निर्माण झाली आहे.
गतवेळी विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री शिवाजीराव नाईक व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख हे दोन नेते एकत्र आल्याने भाजपची ताकद वाढल्याचे चित्र होते. मात्र, युवा नेते सम्राट महाडिक यांची अपक्ष उमेदवारी आणि दोन्ही नेते एकत्र असतानाही मानसिंगराव नाईक यांनी मोठ्या फरकाने बाजी मारली. त्यातच राज्यातील भाजपची सत्ता गेल्याने विकासकामांसाठीच्या निधीवर मर्यादा आल्या. देशात सत्ता असूनही त्याचा फायदा घेता येत नसल्याने दाेन्ही नेत्यांसमाेर अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख यांच्या ऐक्याची ताकद कागदावरच राहिली. जिल्हा परिषदेमध्ये सत्ता असून फायदा नाही. पंचायत समिती नाही, बाजार समितीत सत्यजित देशमुख मानसिंगराव नाईक गटाबरोबर आहेत. देशमुख यांच्याकडे मोठा कोणताही उद्याेग नाही तर शिवाजीराव नाईक यांचे उद्याेग-व्यवसाय अडचणीत आहेत. दुसरीकडे मानसिंगराव नाईक यांच्या विश्वास उद्याेग समूहातील सर्वच प्रकल्प जोरात सुरू आहेत. सूतगिरणी सुरु करण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. पालकमंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मोठ्या निधी मिळत आहे. मानसिंगराव नाईक व विराज नाईक यांचा नियमित संपर्क असल्याने सामान्य कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. परिणामी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख यांना त्रासाच्या ठरणार असल्याची चर्चा आहे. भाजपमधील पडझड वेळीच न रोखल्यास नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.
चाैकट
महाडिक आतापासूनच चर्चेत
सम्राट महाडिक यांनी विधानसभेची अपक्ष लढवलेली निवडणूक, घेतलेले मतदान, त्यानंतर त्यांचा भाजपात झालेला पक्ष प्रवेश त्याचबरोबर सततचा जनसंपर्क आणि वैयक्तित संबंध याच्या जोरावर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तेच प्रमुख दावेदार असणार अशी चर्चा आतापासूनच भाजप कार्यकर्त्यात सुरू आहे.