मिरज पंचायत समितीवर भाजपचा झेंडा
By admin | Published: March 14, 2017 11:47 PM2017-03-14T23:47:00+5:302017-03-14T23:47:00+5:30
सभापतीपदी जनाबाई पाटील : उपसभापतीपदी काकासाहेब धामणे, काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षात फूट
मिरज : मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी लिंगनूरच्या जनाबाई पाटील यांची व उपसभापतीपदी मालगावचे काकासाहेब धामणे यांची निवड करण्यात आली. भाजपने दोन्ही पदे मिळवित स्थापनेपासून काँग्रेसची सत्ता असलेल्या पंचायत समितीवर झेंडा फडकविला. उपसभापती निवडीत भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी युती करीत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले. मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदाची निवड पार पडली. सदस्यांचे संख्या बलाबल समान असताना, खा. संजय पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ या भाजप नेत्यांनी राजकीय खेळी करीत काँग्रेससह राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवत पंचायत समितीवर भाजपची सत्ता आणली. पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे दहा सदस्य निवडून आले. एका अपक्षाच्या पाठिंब्याने पक्षाचे ११ सदस्य संख्या बलाबल झाले होते. विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व अजितराव घोरपडे प्रणित विकास आघाडीचे मिळून ११ सदस्य असे समान सदस्य संख्या बलाबल होते. यामुळे भाजप व काँग्रेसमध्ये पंचायत समितीची सत्तेसाठी जोरदार चुरस होती. दोन्ही पक्षांनी बहुमताचा दावा केल्याने काँग्रेस सत्ता कायम ठेवणार की पंचायत समितीवर भाजपचे कमळ फुलणार याची सर्वांना उत्सुकता होती. मात्र निवडीत विचित्र राजकीय नाट्य घडले. भाजपमध्ये फूट पाडण्याच्या प्रयत्नात काँग्रेसच्या मित्रपक्षात फूट पडल्याचे दिसून आले. सभापतीपदासाठी भाजपच्या जनाबाई पाटील, विरोधी काँग्रेसच्या पूनम महेश कोळी व सुवर्णा बाळासाहेब कोरे यांनी अर्ज दाखल केले होते. तर उपसभापतीपदासाठी भाजपचे काकासाहेब धामणे, काँग्रेसचे रंगराव जाधव, सतीश कोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक मोहिते, जयश्री डांगे या पाचजणांनी अर्ज दाखल केले होते. सुवर्णा कोरे यांनी माघार घेतल्याने सभापतीपदासाठी जनाबाई पाटील यांच्या विरोधात काँग्रेसच्या पूनम कोळी यांच्यात, तर उपसभापतीपदासाठी जयश्री डांगे व सतीश कोरे यांनी माघार घेतल्याने भाजपचे काकासाहेब धामणे, राष्ट्रवादीचे अशोक मोहिते , काँग्रेसचे रंगराव जाधव यांच्यात लढत झाली. हात उंचावून मतदानाने निवडी करण्यात आल्या. सभापतीपदासाठी जनाबाई पाटील यांना राहुल सकळे व शालन भोई या दोन अपक्षांच्या पाठिंब्यावर १२ मते मिळाली. विरोधी काँग्रेसच्या पूनम कोळी यांना काँग्रेस, राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह १० सदस्यांची मते मिळाली. उपसभापती निवडीत काकासाहेब धामणे यांना तब्बल २० मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक मोहिते यांना केवळ दोन व काँग्रेसचे रंगराव जाधव यांना एकही मत मिळाले नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सभापतीपदी जनाबाई पाटील व उपसभापतीपदी काकासाहेब धामणे यांच्या निवडीची घोषणा केली. खा. संजय पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, मावळते सभापती प्रवीण एडके, उपसभापती जयश्री कबुरे यांनी नूतन सभापती व उपसभापतींचा सत्कार केला. सभापती निवडीत मतदान करणाऱ्या राष्ट्रवादीला डावलून काँग्रेसने भाजपचे काकासा हेब धामणे यांना मतदान केल्याने या निवडीत भाजप व काँग्रेसची युती झाल्याचे दिसून आले. काकासाहेब धामणे हा कामाचा माणूस असल्याने काँग्रेसने उपसभापतीपदासाठी भाजपला पाठिंबा दिला. भाजप व काँग्रेस युतीचे खा. संजय पाटील यांचे श्रेय असल्याचे माजी सभापती व विद्यमान सदस्य अनिल आमटवणे यांनी सांगितले. निवडीची घोषणा होताच लिंगनूर व मालगाव येथून आलेल्या कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. पंचायत समितीवर भाजपची सत्ता आल्याने अरविंद तांबवेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर) खासदार आणि आमदारांत संघर्ष सभापतीपदी व उपसभापतीपदी जनाबाई पाटील व काकासाहेब धामणे यांच्या निवडीने पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला. मात्र उपसभापती निवडीवरुन खा. संजय पाटील व आ. सुरेश खाडे यांच्यात संघर्ष निर्माण झाला. आ. खाडे यांनी उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या अशोक मोहिते यांचा आग्रह धरला होता. मात्र खा. संजय पाटील यांनी मोहिते यांना विरोध करीत भाजपच्या काकासाहेब धामणे यांना उमेदवारी अर्ज दाखल करावयास लावला. खा. पाटील यांनी धामणे यांच्यासाठी काँग्रेस सदस्यांचा पाठिंबा मिळवून आ. खाडे व राष्ट्रवादीवर मात केली. केवळ दोन मते मिळाल्याने अशोक मोहिते यांनी पंचायत समितीत काँग्रेस भाजपमय झाल्याचा आरोप केला. पारदर्शक कारभारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत घेण्यास विरोध असल्याच्ो खा. संजय पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादीचा दुहेरी डाव काँग्रसने उधळला भाजपकडे राष्ट्रवादीचे दोन, अपक्षासह १४ सदस्यांचे संख्याबळ होते. मात्र राष्ट्रवादीच्या दोन्ही सदस्यांनी सभापती निवडीत काँग्रेसच्या पूनम कोळी यांना मतदान केले व उपसभापतीसाठी भाजपच्या सूचकासोबत अशोक मोहिते यांचा अर्ज दाखल केला होता. राष्ट्रवादीने काँग्रेस व भाजपच्या मदतीने सत्तेत येण्याची दुहेरी खेळी खेळली. मात्र काँग्रेसने उपसभापती निवडीत भाजपला पाठिंबा देत राष्ट्रवादीची ही खेळी उधळून लावली.