ही फक्त ठिणगी, बारामतीच्या राष्ट्रवादी कार्यालयावरही भाजपचा झेंडा फडकेल - गोपीचंद पडळकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 07:13 PM2022-10-22T19:13:58+5:302022-10-22T19:20:36+5:30
राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावरती देखील काही वर्षांतच भाजपचा झेंडा फडकेल
राहुल संकपाळ
उमदी : उमदीत राष्ट्रवादीच्या कार्यालयावर भाजपचा झेंडा लावला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयासोबतच सर्व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ही फक्त ठिणगी आहे. यापुढे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावरती व बारामती येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयावरतीदेखील काही वर्षांतच भाजपचा झेंडा फडकेल. उमदी येथील भाजप कार्यालय उद्घाटन हा इतिहास ठरेल, असे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले.
उमदी (ता. जत) येथे भाजप कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार विलासराव जगताप, डॉ. रवींद्र आरळी उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्या लता कुळ्ळोळी, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष फिरोज मुल्ला, युवा नेते सुरेश गौडा कुळ्ळोळी, बंडा पवार, धोंडिराम शिंदे, बसवराज पाटील, दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष राहुल श्रीमक्कळ, ग्रामपंचायत सदस्य शिवानंद कुळ्ळोळी, नामदेव सातपुते, राजु मकानदार, मोदीन तांबोळी, आदींंसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
विलासराव जगताप म्हणाले की, राष्ट्रवादीचे फिरोज मुल्ला आपल्या कार्यालयासह स्वतः कार्यकर्ते घेऊन भाजपमध्ये प्रवेश करतात यांचा विचार राष्ट्रवादीने करावा. तुमची विचारधारा बदला. काँग्रेस पक्ष हा फक्त पै-पाहुणे यांच्या पुरताच राहिला आहे.
पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, आमचं सरकार आल्यानंतर जत तालुक्यात पाण्यासाठी १२० कोटी रुपये दिले. मात्र, पहिल्या सरकारने अडीच वर्षांत एक रुपयाही दिला नाही. आपलं सरकार लोकांची कामं करणारं सरकार आहे.
यावेळी युवा नेते संजय तेली, तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत, तम्मानगौडा रवी पाटील, रवी शिवपुरे, मलु सालुटगी, उमेश सावंत, आण्णा भिसे, संगम ममदापुरे, पिरसाब जमादार, निसार मुल्ला, चंद्रकांत नागणे, संगू माळी, रोहिदास सातपुते उपस्थित होते. सुभाष कोकळे यांनी प्रास्ताविक केले. मनोहर पवार यांनी सुत्रसंचालन केले. राजू चव्हाण यांनी आभार मानले.