भाजप सरकार हमाल, कष्टकऱ्यांच्या विरोधात
By admin | Published: April 29, 2016 11:14 PM2016-04-29T23:14:57+5:302016-04-30T00:53:22+5:30
बाबा आढाव : दुष्काळाचे राजकारण थांबवून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करा
सांगली : भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांनी हमाल, कष्टकऱ्यांच्या विरोधातील धोरणे राबविण्याचा सपाटाच लावला आहे. परंतु, या धोरणात बदल न केल्यास सरकार उलथवून टाकण्याची हिमतसुध्दा कष्टकऱ्यांमध्येचआहे, हेही त्यांनी विसरू नये, अशी टीका महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी शुक्रवारी येथे केली. दुष्काळग्रस्तांच्या पाण्यावरूनचे राजकारण थांबवा आणि येत्या पावसाळ्यातील पाण्याचा थेंब न् थेंब अडविण्याचे नियोजन करा, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला.
सांगली जिल्हा हमाल पंचायतच्या वार्षिक सभेत डॉ. आढाव बोलत होते. यावेळी हमाल पंचायतचे सचिव बापूसाहेब मगदूम, बाळू बंडगर, गोविंद सावंत, राजाराम बंडगर, मारूती कोळेकर, प्रल्हाद व्हनमाने, बजरंग खुटाळे, विकास मगदूम, नाना म्हारगुडे, शालन सरगर आदी प्रमुख उपस्थित होते.
डॉ. आढाव म्हणाले की, भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून भांडवलदारांना पोषक आणि कष्टकरी, हमाल, शेतकऱ्यांच्या विरोधातील धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. पहिला निर्णय त्यांनी हमाल मापाडी कायद्यातून छोटे उद्योग वगळण्याचा घेतला. संघटनेने विरोध केल्यामुळे पुन्हा तो मागे घेतला. शेतकऱ्यांच्या हिताचा मुद्दा पुढे करून बाजार समित्याच बरखास्त करण्याबाबतही हालचाली होत्या. तसे झाले तर हमाल बांधवांना संरक्षण राहणार नाही. प्रत्येक शासकीय यंत्रणेचे खासगीकरण करण्याचाही सपाटा लावला आहे. ही धोरणे खरोखरच कष्टकरी, शेतकरी आणि हमालांच्या विरोधातील आहेत. म्हणून शासनाच्या या धोरणाविरोधात सर्वांनी संघटित लढा दिला पाहिजे. खासदार, आमदारांच्या पेन्शन वाढीचा ठराव लगेच मंजूर होतो. अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोगही लगेच लागू होतो. परंतु, कष्टकरी, वृध्दांसाठी पेन्शन मंजूर होत नाही. यातूनच देशात गरीब आणि श्रीमंत अशी विषमतेची मोठी दरी निर्माण होत आहे. भाजप सरकारने कष्टकऱ्यांच्याविरोधातील धोरणे बदलली नाहीत, तर सरकार उलथवून टाकण्यात येईल.
दरम्यान, डॉ. आढाव यांनी घरकाम करणाऱ्या महिलांनाही मार्गदर्शन केले. पेन्शनच्या प्रश्नावर सांगलीच्या खासदारांची गाडी अडवण्याची सूचना दिली. विद्या स्वामी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
बाजार समित्यांनी हमी फंड तयार करावा
शेतीमालाला हमी भाव मिळत नसल्याचे कारण पुढे करून बाजार समित्या बरखास्त करण्याचा सरकारचा डाव होता. पण, तो शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी घातक असून व्यापाऱ्यांच्या हिताचा आहे. शेतकऱ्यांचे हित सरकारला पाहायचे असेल, तर बाजार समितीच्या परिसरात हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा. तो अधिकार बाजार समित्यांना आहेच. शिवाय, यातूनही हमीभावापेक्षा कमी खरेदी होत असेल, तर बाजार समित्यांनी शेतीमाल हमीभावासाठी फंड तयार करावा. यातूनच हमीभाव शेतकऱ्यांना देण्याची तरतूद करावी, असे मत डॉ. आढाव यांनी व्यक्त केले.
हमाल भवनच्या खर्चावरून नेत्यांवर टीकास्त्र
सांगली जिल्हा हमाल पंचायतीतर्फे हमाल भवन बांधण्याचे काम सुरु आहे. यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी १९९५ मध्ये अडीच लाख रुपये दिले होते. याचे व्याजाने २३ लाख झाले असून या निधीतून हमाल भवन बांधले जात आहे. या निधी खर्चावरून बाळू बंडगर यांनी नेत्यांवर टीका केली. या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर डॉ. आढाव यांनी भाषणात बंडगर यांचा समाचार घेतला. पैसे कोणाचे आणि बोलतेय कोण, अशी खिल्ली उडवीत, तुम्ही पैसे गोळा करा आणि त्यानंतर त्याचा हिशेब मागा, असा सल्लाही त्यांनी दिला.
अमेरिकेत मोलकरणीला न्याय मिळतो, भारतात का नाही?