भाजप सरकारचा धनगर समाजाकडून निषेध
By admin | Published: April 1, 2017 11:51 AM2017-04-01T11:51:07+5:302017-04-01T11:51:07+5:30
शब्द फिरविणाऱ्या मोदींना सद्बुध्दी देण्याचे सांगलीत गणपतीला समाजबांधवांकडून साकडे
आॅनलाईन लोकमत
सांगली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला एसटी समाजात समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले होते. फडणवीस यांनी तर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतच आरक्षण देण्याच्या घोषणा देऊन समाजाची मते आणि सत्ताही मिळविली. निवडणुकीनंतर मात्र मोदी आणि फडणवीस हे आरक्षण देता येत नसल्याचे सांगून धनगर समाजाची फसवणूक करीत आहेत. याबद्दल समाजबांधवानी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून निषेध केला. तसेच मोदींना सद्बुध्दी देण्याचे साकडेही समाजबांधवांनी सांगलीतील गणपतीला घातले.
दिल्लीत गुरुवारी नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छात्तीसगडच्या खासदारांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये धनगर समाजाचे आरक्षण आणि ओबीसी मंत्रालय या मुद्द्यांवर चर्चा झाली. महाराष्ट्रातील खासदारांनी धनगर समाज शब्दातील घोळ दूर करून देशताील इतर धनगर समाजाप्रमाणे महाराष्ट्रातील धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करण्याची मागणी केली होती. या मागणीकडे मोदी यांनी दुर्लक्ष केल्याची माहिती भाजप खासदारांकडूनच समाजबांधवांना मिळाली आहे. मोदी यांनी आरक्षण देण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे महाराष्ट्रातील समाजबांधवांच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप समाजातील तरूणांनी केला.
सांगली जिल्ह्यातील धनगर समाजातील युवकांनी भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला. मोदी आणि फडणवीस सरकार धनगर समाजाला न्याय देईल, अशी अपेक्षा होती. परंतु, भाजप सरकार सत्तेवर येऊन अडीच ते तीन वर्षे झाली, तरीही धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. उलट मोदी आणि फडणवीस यांच्याकडून समाजाला आरक्षण कसे देता येत नाही, अशीच विधाने केली जात आहेत. यामुळे समाजाची फसवणूक होत असल्याचे दिसत आहे. याबद्दल सांगली जिल्हा धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मोदींच्या विधानाबद्दल सांगलीतील गणपती मंदिरात जाऊन कार्यकर्त्यांनी आरती करून, त्यांना सद्बुध्दी देण्याचे तसेच निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची त्यांना आठवण करून देण्याचेही साकडे घातले. त्यानंतर गणपती पेठेत भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या.
यावेळी नगरसेवक विष्णू माने, अमर पडळकर, सुरेश टेंगले, अमित पारेकर, संदीप टेंगले, अजित दुधाळ, आनंद लेंगरे, भारत खांडेकर, विनायक कोळेकर, भारत व्हनमाने, हरिदास लेंगरे, रामभाऊ मासाळ यांच्यासह शेकडो तरूण आंदोलनात सहभागी होते.
धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांची उद्या बैठक
धनगर समाजाच्या आरक्षणाकडे भाजप सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या प्रश्नावर आंदोलन छेडण्यासाठी जिल्ह्यातील धनगर समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची रविवार दि. २ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सांगलीतील विजयनगर येथील अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती विष्णू माने व सुरेश टेंगले यांनी दिली.