सांगलीचा पेच सुटला; भाजपची सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी, महाआघाडीच्या निर्णयाकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 01:55 PM2024-10-21T13:55:48+5:302024-10-21T13:56:48+5:30
मिरजेतून खाडे चौथ्यांदा मैदानात, शिवाजी डोंगरे यांचे बंडखोरीचे संकेत
सांगली : यंदाची विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी जाहीर केला होता. त्यामुळे सांगलीतील उमेदवारीवरून संभ्रम निर्माण झाला होता. पक्षाने सर्व चर्चांना पूर्णविराम देत सांगलीची उमेदवारी पुन्हा गाडगीळ यांनाच जाहीर केल्याने येथील कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर झाला आहे, तर मिरजेतून अपेक्षेप्रमाणे पालकमंत्री सुरेश खाडे यांना चौथ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे.
यंदा विधानसभेला लढणार नसल्याचे सांगून आमदार गाडगीळ यांनी खळबळ उडवून दिली होती. हा निर्णय मागे घेण्यासाठी अनेकांनी त्यांना साकडे घातले. परंतु, ते ठाम राहिले. त्यामुळे सांगलीत भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
भाजपमधील इच्छुक शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, पृथ्वीराज पवार, माजी आमदार नितीन शिंदे, शेखर इनामदार, धीरज सूर्यवंशी यांनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली होती. त्यांच्या पदरी निराशा आली आहे. मात्र, पृथ्वीराज पवार यांनी गाडगीळ यांच्या उमेदवारीच्या निर्णयाचे स्वागत केले.
एकीकडे भाजपने सांगली, मिरजेची उमेदवारी जाहीर केली असताना, विरोधी महाआघाडीत कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही मतदारसंघांत तिकिटासाठी पक्षांतर्गत संघर्ष सुरू आहे. सांगलीतून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा बँक उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी दावेदारी केली आहे. परंतु, उमेदवारीचा फैसला वरिष्ठांच्या कोर्टात गेला आहे.
खाडे, गाडगीळ यांचा सामना कोणाशी?
गाडगीळ आणि खाडे यांच्याविरोधात महाआघाडीतून कोण मैदानात उतरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार गाडगीळ यांची लढत पृथ्वीराज पाटील की, जयश्री पाटील यांच्याशी होणार? की तिरंगी लढत, याची चर्चा रंगली आहे. खाडे यांचा सामना मोहन वनखंडे की, अन्य कोणाशी होणार, याकडेही लक्ष लागले आहे.
पक्षादेश अंतिम : सुधीर गाडगीळ
निवडणूक न लढविण्याचा निर्णय मी जाहीर केला होता. पण, पक्षादेश अंतिम असल्याने तो मान्य करून उमेदवारी स्वीकारत माझा निर्णय मागे घेतो. निवडणुकीला मी जनतेसमोर येत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार गाडगीळ यांनी व्यक्त केली.
शिवाजी डोंगरे यांचे बंडखोरीचे संकेत
पक्षाचा हा निर्णय मनाला वेदना देणारा आहे. अपक्ष लढणार की नाही, हा निर्णय लवकरच घेऊ, अशी ‘पोस्ट’ डाेंगरे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर टाकली आहे. त्यामुळे त्यांच्या बंडखोरीचे संकेत मिळत आहेत.